काळाराम मंदिराच्या ठिकाणी पूर्वी अरण्य होते. सध्या जेथे श्री काळाराम मंदिर आहे, त्या मंदिराच्या ठिकाणी श्रीरामांची ‘पर्णकुटी’ होती. श्रीराम सव्वादोन वर्षे पंचवटीत वास्तव्याला होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिक रोड येथील जहांगिरी असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली आणि याच काळात ओढेकर यांना प्रभू श्रीरामाचा ‘तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा’ असा स्वप्न दृष्टांत झाल्याचे बोलले जाते.
काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदासस्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या ‘रामकुंडा’त मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या ‘रामशेज’ किल्ल्याच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत. या डोंगरावरील दगड काढल्यानंतर दूध आणि नवसागर टाकून उकळून त्याची परीक्षा केली गेली. पूर्ण बांधकामासाठी सिमेंट अथवा पाण्याचा वापर झालेला नाही. बांधकाम या दगडांपासून झाले आहे. १७७८ ते १७९० या कालखंडात मंदिर पूर्ण झाले. त्यावेळेस या मंदिराच्या बांधकामाला २३ लाख खर्च आल्याचे सांगितले जाते. काळाराम मंदिर हे हेमाडपंथी वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून ओळखले जाते.
100721\10nsk_1_10072021_13.jpg
नाशिकचे वैभव - काळाराम मंदिर