नाशिक : प्रशांत खरोटे, आॅनलाइन लोकमत - वन्यजीव छायाचित्रणासाठी ताडोबा माझा नेहमीच पसंतीचा राहिला आहे. ताडोबा हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाने ताडोबा ओळखले जाते. ताडोबाने कधी आजपर्यंत निराश केले नाही. यावेळेस ताडोबा सफारीचा भन्नाट अनुभव माझ्या शिदोरीमध्ये जमा झाला.
एक नव्हे दो नव्हे तर तब्बल पाच दिवसांत सहा सफारी मी माझ्या छायाचित्रकार मित्रांच्या साथीने ताडोबाच्या पुर्ण केल्या. ताडोबा अभयारण्य पट्टेरी वाघांच्या वास्तव्यासाठी जगप्रसिध्द आहे. ‘अभयारण्य’ या शब्दातच त्याचा अर्थ दडलेला आहे. भय नसलेले आरण्य अशा या अरण्यात फिरताना वन्यजीव मुक्तपणे विहार करत होते तर आम्ही मनुष्यप्राणी त्यांच्या प्रदेशात जणू जिप्सीमध्ये कैदच होतो अन् ते होणे स्वभाविक आहे कारण आम्ही प्राणी संग्रहालयात नव्हे तर अभयारण्यात सफारी करत होतो.
ताडोबा हे वाघ, सांबर, मगर, वानर, हरिण यांसारख्या विविध वन्यजीव प्राण्यांच्या वास्तव्यासाठी ओळखले जाते. याबरोबरच पक्ष्यांचेही विविध प्रकार ताडोबामधील जैवविविधता सांगून जाते. ताडोबाची सफारी माझ्यासाठी नेहमीच रोमांचकारी ठरली आहे. ‘तारा’ बाळांतीण झाली असे समजले आणि माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. ही शुभवार्ता कानावर येताच माझी पावले ताडोबाच्या दिशेने वळाली. बाळांतीण झालेली वाघाची मादी व तिचे छावे ताडोबाच्या अभयारण्यात मला बघायला मिळाले.