नाशिक : ग्रामीण भागातील महिला प्रसुतीसाठी अद्यापही ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयाला प्राधान्य देतात. तालुका किंवा जिल्ह्याच्या शहरातील गरीब महिला मनपा रुग्णालयांकडे वळतात. त्यातही काही महिलांचे कुटुंबिय शासकीयऐवजी छोट्या खासगी रुग्णालयांना प्राधान्य देतात. विशेषत्वे काही समस्या असतील, गुंतागुंतीची प्रसुती असेल तर मात्र शासकीयऐवजी खासगी रुग्णालयांनाच प्राधान्य देतात.
वर्षभरात राज्यात होणाऱ्या लाखो महिलांची प्रसूतीपैकी सुमारे २५ ते ३० टक्के महिलांची प्रसुती शासकीय ,मनपा रुग्णालयांमध्ये तर उर्वरीत ७० टक्के प्रसुती खासगी रुग्णालयांमध्येच होतात. त्यातही शासकीय रुग्णालयात येणाऱ्यांपैकी बहुसंख्य महिला या ग्रामीण किंवा आदिवासी क्षेत्रातील असतात. त्यांच्यात शारीरिक अशक्तता, प्रोटीन, कॅल्शियमसारख्या घटकांची उणीव असल्याने त्यांची प्रसुती अवघडच असते. मात्र, आर्थिक परिस्थिती नसल्यानेच त्या शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल होतात.
इन्फो
शासकीयमध्ये नॉर्मल, खासगीत सीझर
काही खासगी रुग्णालयांमध्ये गरज नसताना सिजेरियन प्रसूती करण्यात आल्याचे बोलले जाते. गरज नसताना महिलांची सिझेरियन प्रसूती केल्याने लोकांच्या खिशाला नाहक भार पडत असून बाळांना स्तनपान करण्यास उशीर झाल्याचे प्रकारदेखील घडतात. त्यामुळे नवजात बाळाचे वजन कमी होण्याच्या घटनादेखील घडतात. सुरक्षित प्रसूती व्हावी यासाठी महिला व त्यांचे नातेवाईक सरकारी हॉस्पिटलपेक्षा खासगी हॉस्पिटलांना प्राधान्य देतात. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणच्या आकडेवारीनुसार, खासगी हॉस्पिटलमध्ये ३४ टक्के सिजेरियन प्रसूती तर सरकारी हॉस्पिटलमध्ये केवळ १८ टक्के प्रसुती करण्यात येते. शासकीयमध्ये बहुतांश प्रसुती नॉर्मल तर खासगीत अधिक प्रसुती सीझर होतात. खासगी हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेल्या सिझेरियन प्रसुतीकडे संशयाने बघितले जाते. नैसर्गिक प्रसूतीत खर्च खूप कमी होतो तर सिजेरियनमध्ये रुग्णालयाच्या श्रेणीनुसार २५ ते ५० हजारांपर्यंत खर्च येतो.
म्हणून शासकीयऐवजी खासगी
शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छतेचा अभाव असतो. त्यामुळे आपल्या बाळाला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊ नये, या काळजीपोटीच आम्ही शासकीयऐवजी खासगी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल झालो.
शेवंता काकड, गर्भवती महिला
शासकीय रुग्णालयात प्रसुतीबरोबरच कोरोनाचेही उपचार केले जातात. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत केवळ प्रसुती रुग्णालयात जाणेच योग्य ठरणार असल्यामुळेच खासगी रुग्णालयाचा पर्याय स्वीकारला आहे.
सुषमा शेवाळे, गर्भवती महिला