नाशिक : कोरोना काळातदेखील सरावात खंड पडू न देण्याच्या निर्धाराचा मला निश्चित फायदा झाला.पुढील सहा महिन्यात होणाऱ्या सिनीअर नॅशनल्सचे विजेतेपद मिळवण्यासाठीच मी प्रयत्न करीत आहे. तसेच परफॉर्मन्स वाढवत नेऊन भविष्यात एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेपर्यंतचे ध्येय मी ठेवले असल्याचे नाशिकची युवा धावपटू दुर्गा देवरे हिने सांगितले.
नुकत्याच झालेल्या प्रजाकसत्ताक दिनाच्या सोहळ्यात दुर्गा देवरे हिला पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्ह्यातील गुणवंत क्रीडापटू पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.दुर्गा ही ८०० आणि १५०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सध्या २ मिनिटे ०७ सेकंद आणि ४ मिनिटे २३ सेकंद अशी वेळ देऊन जिल्ह्यात मिडल डिस्टन्सची सर्वोत्तम धावपटू म्हणून तिचा नावलौकीक कायम ठेवला आहे. पुरस्काराच्या पार्श्वभूमीवर दुर्गासमवेत झालेल्या संवादात तिने भविष्यातील तिच्या योजना आणि ध्येयांबाबत सविस्तर माहिती दिली.
प्र. - मिडल डिस्टन्स इव्हेंटमध्ये कोणत्या प्रकारची गुणवत्ता अधिक लागते , असे तुला वाटते ?
दुर्गा - या इव्हेंटमध्ये स्टॅमिनाबरोबरच एन्ड्युरन्स, पॉवर आणि स्ट्रेंग्थ असा सर्व प्रकारांनी जोर लावावा लागतो. त्यामुळेच मिडल डिस्टन्स हा प्रकार काहीसा कठीण मानला जात असला तरी ८०० आणि १५०० मीटर हेच माझे आवडते इव्हेंट आहेत.
प्र. - कोरोना काळात सरावात खंड पडला का ? त्याचा टायमिंगवर काही परिणाम झाला का ?
दुर्गा - कोरोना काळात ट्रॅकवर सरावाला परवानगी नव्हती. त्या काळात मी रोडवरच सराव करीत होते. त्यामुळे सरावात खंड पडू न देण्याचादेखील फायदा झाला. तसेच दिवाळीनंतर मिनाताई ठाकरे स्टेडीयमच्या ट्रॅकवर सरावाला परवानगी मिळाल्यामुळे तेव्हापासून सरावाला अधिक वेग दिल्याने टायमिंगमध्ये सकारात्मक फरक झाला आहे.
प्र. सध्या किती वेळ सराव करतेस ? तसेच ट्रॅकवरील सरावास प्रारंभ केल्यानंतर किती कालावधीत पूर्वीचे टायमिंग साधणे शक्य झाले ?
दुर्गा - सध्या मी दररोज सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी अडीच तास याप्रमाणे सराव आणि फिटनेससाठी देते. ट्रॅकवर सरावाला प्रारंभ केल्यानंतर सहा आठवड्यांमध्ये मला पूर्वीचीच वेळ गाठणे शक्य झाले असून आता त्यापेक्षाही कमी वेळेत दोन्ही इव्हेंट पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न आहे.