नाशिक : महापालिकेने केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत पहिल्या टप्प्यात शहरात ६५३९ वैयक्तिक शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण केल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात सुमारे आठ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. दरम्यान, महापालिकेने याबाबत येत्या २० मार्चपर्यंत सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षकांकडून सविस्तर अहवाल मागविला आहे. महापालिकेने स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारच्या अनुदानातून मागील वर्षी सुमारे ७५०० वैयक्तिक शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला होता. मात्र, सुमारे ३०० हून अधिक लाभार्थ्यांनी अनुदानाचा पहिला सहा हजाराचा हप्ता घेतला, परंतु शौचालय न उभारता मनपाला शेंडी लावली. त्यामुळे या लोकांकडून अद्यापही हप्त्याची रक्कम परत मिळू शकलेली नाही. काही भागात शौचालय उभारणीसाठी पुरेशी जागा नसल्याचे सांगत अनेक लाभार्थींनी अनुदान परत केले होते. त्यामुळे महापालिकेला शौचालय उभारणीचे उद्दिष्ट घटवून ते ६५४६ वर आणावे लागले. दरम्यान, महापालिकेने जानेवारी २०१७ अखेर सहाही विभाग मिळून ६५४६ वैयक्तिक शौचालये व २५ ठिकाणी गट शौचालय उभारणीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. महापालिकेने पहिल्या टप्प्यातील उद्दिष्ट पूर्ण केले असले तरी अद्याप शहर हगणदारीमुक्त होऊ शकले नाही. आता महापालिकेने दुसऱ्या टप्प्यात सुमारे ७८०० वैयक्तिक शौचालये उभारणीचे उद्दिष्ट समोर ठेवले असून, त्याबाबतची आढावा बैठक अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी स्वच्छता निरीक्षकांकडून विभागीय स्तरावर आवश्यक शौचालयांची माहिती सादर केली. बोर्डे यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या २० मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले. बैठकीला आरोग्याधिकारी डॉ. विजय डेकाटे व सहायक आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाणे उपस्थित होते.
दुसऱ्या टप्प्यात ८ हजार शौचालय उभारणीचे उद्दिष्ट
By admin | Published: March 09, 2017 1:43 AM