सायखेडा : गोदाकाठ भागातील तारुखेडले येथील पाच वर्षेच्या मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच नागापूर येथील बबन सखाराम आडके यांची शेळी बिबट्याच्या हल्ल्यात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या दरम्यान केलेल्या हल्ल्यात जखमी झाली तर अशीच घटना चाटोरी (ता. निफाड) येथील संतोष गणपत हिरे यांच्या जर्सी गोऱ्ह्यावर शुक्र वारी (दि.८) बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जखमी झाल्याने पुन्हा बिबट्याची दहशत या भागात पसरली आहे.चाटोरी आणि नागापूर ही गावे गोदावरी नदीच्या तीरावर असल्याने या परिसरात उसाचे क्षेत्र मोठे आहे. नदीच्या काठी दाट झाडी असल्याने बिबट्याला लपण्यासाठी योग्य वातावरण आहे; मात्र बिबट्याला भक्ष्य मिळत नसल्याने तो मानवी वस्तीकडे फिरकतो. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तारुखेडले येथे लहान मुलीवर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमवावा लागला होता. गोदाकाठ भागातील नागापूर, चाटोरी भागाकडे बिबट्याने मोर्चा वळविल्याने पुन्हा या भागात दहशत निर्माण झाली आहे. या ठिकाणी वनरक्षक व्ही. आर. टेकनर, वनसेवक भय्या शेख, दत्तू आहेर, रामचंद्र गंडे, विजय लोंढे, पिंटू निहारे इत्यादिनी भेट देत पिंजरा लावला खरा; मात्र दिवसेंदिवस बिबट्याचे होणारे हल्ले लक्षात घेऊन वनविभागाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)
चाटोरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
By admin | Published: April 08, 2017 12:10 AM