नाशिक : वाढत्या कोरोनाच्या परिस्थितीमुळे शासनाने घेतलेल्या निर्णयाला प्रतिसाद म्हणून कुसुमाग्रज प्रतिष्ठानने कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी आयोजित केलेला गोदावरी गौरव पुरस्कार समारंभ पुन्हा स्थगित करण्यात आला आहे.
या पुरस्कार समारंभाचे आयोजन शनिवारी (२७ फेब्रुवारी) महाकवी कालिदास कलामंदिरात करण्यात आले होते. एक वर्षाआड दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा गोदावरी गौरव पुरस्कार विशिष्ट क्षेत्रात असामान्य कामगिरी करून, भारतीय समाजाचे सांस्कृतिक, सामाजिक जीवन समृद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींना प्रतिष्ठानतर्फे कृतज्ञतेचा नमस्कार असतो. मागील वर्षी १० मार्चला होणारा हा पुरस्कार कोरोनाच्या धोक्यामुळे शासनाच्या निर्णयानुसार स्थगित करण्यात आला होता. तो या वर्षी २७ फेब्रुवारी रोजी होणार होता. मात्र, प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या आज सायंकाळी झालेल्या बैठकीत अध्यक्ष न्या.नरेंद्र चपळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा पुरस्कार सोहळा पुन्हा काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, नाशिकला मार्च महिनाअखेर होणाऱ्या साहित्य संमेलनाबाबत रविवारी झालेल्या बैठकीत कोरोनाबाबतचा आढावा घेऊन, तसेच पुरेशी दक्षता घेऊन संमेलन होणार असल्याचे सांगण्यात आले होते.
नाट्य परिषदेचे पुरस्कारही लांबणीवर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने देण्यात येणारा वि.वा. शिरवाडकर स्मृती लेखन पुरस्कार, तसेच वसंत कानेटकर स्मृती रंगकर्मी आणि बाबुराव सावंत स्मृती नाट्यकर्मी पुरस्कार सोहळा येत्या शुक्रवारी (दि.२६) आयोजित करण्यात येणार होता. मात्र, परवानगीच मिळणार नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर, हा सोहळा स्थगित करण्यात आल्याचे परिषदेच्या वतीने कळविण्यात आले आहे. या पुरस्कारांची घोषणा नाट्य परिषदेच्या वतीने पूर्वीच करण्यात आली होती. त्यात शिरवाडकर स्मृती लेखन पुरस्कार प्रख्यात साहित्यिक शफाअत खान यांना तर कानेटकर स्मृती रंगकर्मी पुरस्कार दिलीप प्रभावळकर यांना तर सावंत स्मृती नाट्यकर्मी पुरस्कार रवींद्र ढवळे यांना जाहीर झाला होता. संबंधित पुरस्कारार्थींनी परवानगी दिल्यानंतर, २६ फेब्रुवारीला पुरस्कार सोहळ्याची निश्चिती करण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढू लागल्याने, हा सोहळा पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम यांनी सांगितले. त्यांच्यासमवेत प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, ईश्वर जगताप, विजय शिंगणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.