नायगाव : सिन्नर तालुक्याच्या उत्तर भागातील नायगाव खोऱ्यातील शेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या गोदा युनियन कृषक सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी लक्ष्मण सांगळे तर उपाध्यक्षपदी जोगलटेंभी येथील बाबजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली; मात्र निवडीनंतर संचालकांमध्ये दिसून आलेला नाराजीनाट्य चर्चेचा विषय ठरले.
निवडणूक निर्णय अधिकारी प्रेरणा शिवदास यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस दत्तू गिते, परसराम रामराजे, विलास लहाने, शाम कातकाडे, पुरुषोत्तम सौंदाणे, दिनेश काकड, समाधान पानसरे, रवींद्र कापडी, विठ्ठल भाबड, इंदुमती कातकाडे, सुनीता बोडके आदी संचालकांच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी लक्ष्मण वामन सांगळे यांनी अर्ज दाखल केला.
त्यावर सुचक म्हणून संचालक शाम दिगंबर कातकाडे यांनी तर पुरुषोत्तम विठ्ठल सौंदाणे यांनी अनुमोदक म्हणून सही केली.तर उपाध्यक्षपदासाठी बाबजी बाळकृष्ण पाटील यांच्या अर्जावर सूचक म्हणून दिनेश खंडेराव काकड यांनी तर विलास राजाराम लहाने यांनी अनुमोदक म्हणून सही केली. निर्धारित वेळेत दोन्ही पदासाठी एकच अर्ज आल्याने अध्यक्ष म्हणून सांगळे व उपाध्यक्ष म्हणून पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बिनविरोध निवड होताच संस्थेच्या वतीने पंचायत समितीचे माजी उपसभापती संग्राम कातकाडे यांच्या हस्ते नवनिर्वाचितांचा सत्कार करण्यात आला; मात्र यावेळी नाराज असलेल्या निम्या संचालकानी सभागृह सोडल्याने तो चर्चेचा विषय बनला.विश्वासात न घेतल्याचा सूरशेतकऱ्यांची आर्थिक वाहिनी असलेल्या संस्थेच्या निवडणुकीत सभासदांनी विकासाच्या मुद्यावर एकहाती सत्ता दिली; मात्र सत्ता मिळताच ह्यएकला चलो रेह्ण ची पुनरावृत्ती करत निवड प्रसंगी संचालकांना विश्वासात न घेतल्याने काही संचालकांमध्ये नाराजी दिसून आल्याचे चित्र बघावयास मिळाले. येणाऱ्या पाच वर्षांच्या कारभारातील आजच्या परिस्थितीत हा पहिला अंक ठरतो काय याबाबत चर्चा सुरू झाली आहे.