नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व पुरोहित संघाच्या वतीने ५० वर्षांची परंपरा असलेला गंगापूजानाचा सोहळा शुक्रवारी (दि. ३) मंगलमय व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी वाजत-गाजत काढण्यात आलेली कलश मिरवणूक व श्री स्वामी समर्थांच्या जयघोषाने याप्रसंगी रामकुंड परिसरात चैतन्य पसरले होते. गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते पार पडलेल्या गंगापूजनासाठी शेकडो भाविकांनी हजेरी लावली.
ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमीपर्यंत असे दहा दिवस भारतभर गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो. यंदा ३१ मे ते ९ जून या कालावधीत गंगा दशहरा उत्सव साजरा केला जात आहे. यानिमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने गंगा गोदावरी मातेचे पूजन करून तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी सालाबादाप्रमाणे दुपारी गंगापूररोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कलशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गावर रांगोळ्या काढून भाविकांनी स्वागत केले. हाती भगवे ध्वज घेऊन सेवेकरी स्वामीनामाचा जप करत रामकुंड परिसरात पोहोचले. मुख्य सोहळ्यात पुरोहित संघांचे सतीश शुक्ल आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रकल्याण, राष्ट्ररक्षण, सर्व जीवसृष्टीचे कल्याणाचे साकडे गोदामाईला घातले. याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, मनपा आयुक्त रमेश पवार, वत्सला खैरे, महेश हिरे उपास्थित होते.
------
बळीराजाच्या सुखासाठी प्रार्थना
गोदामाईने आपल्या तीरावरील दीड हजार किलोमीटरचा परिसर सर्वार्थाने सुजलाम सुफलाम केला आहे. आपण गोदामाईच्या माध्यमातून पर्जन्यराजास विनंती केली तर तो निश्चितच आपणावर कृपा करतो. पर्जन्यराजाने कृपा करून सर्व जीवसृष्टीला नवचैतन्य द्यावे विशेषतः शेतकरी सुखी, संपन्न व्हावा आणि शेतकरी राजाच्या आत्महत्या थांबाव्यात अशीच आपली मनोकामना आज गोदामाईकडे व्यक्त करत असल्याचे गुरुमाउली अण्णासाहेब मोरे यांनी सांगीतले.