नाशिक : शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांसह विविध स्वयंसेवी व धार्मिक-सामाजिक संस्थांच्या हजारो कार्यकर्त्यांनी हाती खराटे-फावडी घेत गांधीतलावापासून ते तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलापर्यंतच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबविल्याने गोदाघाटाला झळाळी प्राप्त झाली. सुमारे पाच तास चाललेल्या या मोहिमेत नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर गाळ काढण्याबरोबरच घाट परिसरातील केरकचराही हटविण्यात आला. हरितकुंभ संकल्पनेअंतर्गत जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शहरातील चारही नद्यांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गोदाघाटावर गांधीतलावापासून ते तपोवनातील लक्ष्मीनारायण पुलापर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत जिल्हा परिषदेतील कृषी, पशुसंवर्धन, ग्रामीण विकास यंत्रणा व पाणीपुरवठा विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आर्ट आॅफ लिव्हिंग, नाशिक एज्युकेशन सोसायटी, प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय, घरेलू कामगार संघटना, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्था, डायनॅमिक कंपनी, भैय्यू महाराज देशमुख यांचे साधक, मातोरी येथील पंचायत समिती कर्मचाऱ्यांसह शिक्षकवृंद आदि शासकीय-निमशासकीय संस्था-संघटनांचे कर्मचारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. गांधीतलावालगतचा घाट धुण्यापासून ते पात्रात टाकण्यात आलेले निर्माल्य-कपडे बाहेर काढण्यात आले. य. म. पटांगण परिसर, दुतोंड्या मारुती परिसर, नारोशंकर मंदिर परिसर, रामसेतूलगतचा परिसर, कपूरथळा पटांगण, गौरी पटांगण, रोकडोबा पटांगण ते टाळकुटेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण पुलापर्यंतच्या परिसरात साफसफाई करण्यात आली. रोकडोबा पटांगण ते टाळकुटेश्वर मंदिरापर्यंतच्या परिसरातील नदीपात्रातील गाळही काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. कुंडांचीही सफाई करण्यात आली.
गोदाघाटाला झळाळी!
By admin | Published: June 06, 2015 12:14 AM