नाशिक : ऋषीपंचमीच्या निमित्ताने शनिवारी रामकुंड आणि परिसरात भाविकांनी सकाळपासूनच गोदास्नानासाठी मोठी गर्दी केली होती. गतवर्षी गणेशोत्सव काळात कोरोनाची पहिली लाट पूर्ण बहरात असल्याने गणेशोत्सवासह ऋषीपंचमीवरही त्याचे सावट पडले होते. मात्र, यंदा नेहमीप्रमाणे भाविकांनी गंगास्नान करण्यास प्राधान्य दिले.
भाद्रपद मुख्यत्वे करून ओळखला जातो तो गणेशोत्सवासाठी. मात्र, गणेश प्रतिष्ठापनेनंतरच्या दुसऱ्या दिवशी अर्थात भाद्रपद पंचमीला साजऱ्या केल्या जाणाऱ्या ऋषिपंचमीला खूप मोठे महत्त्व आहे. श्रावणातील व्रत-वैकल्यांप्रमाणे ऋषिपंचमीचे व्रतही स्त्रियांनी करावयाचे एक व्रत असल्याची पूर्वापार श्रद्धा आहे. पुराण काळात होऊन गेलेल्या दिग्गज ऋषींविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ऋषिपंचमीचे पालन करण्याची परंपरा आहे. कश्यप, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ आणि अत्री या सात ऋषींची प्रत्येकी एक आणि अरुंधतीची एक अशा एकूण ८ सुपाऱ्या मांडून ही पूजा केली जाते. या दिवशी बैलांच्या कष्टाचे कोणतेही अन्न न खाता स्वकष्टाने पिकवलेले धान्य, कंदमुळे खाण्याची परंपरा आहे. ऋषिपंचमीला विशिष्ट व्रताहार आणि ऋषींचे स्मरण या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या दिवशीचा व्रताहार हा नेहमीच्या उपवासापेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. ऋषिपंचमीला व्रताहारामध्ये केवळ मानवी कष्टातून उत्पन्न झालेले म्हणजेच न नांगरलेल्या जमिनीतील पदार्थांचे सेवन करणे अभिप्रेत असते. मात्र, आजच्या काळात ते शक्य होत नसल्याने भाविक उपवास करून गोदास्नान करण्यास प्राधान्य देतात. त्यामुळेच शनिवारी गोदास्नानासाठी मोठी गर्दी जमली होती.