नाशिक : कार्तिक शुक्ल षष्ठीला प्रारंभ होणाऱ्या छटपूजेला बुधवारी गोदाकाठी उत्साहात प्रारंभ झाला. हिंदी भाषिकांकडील सर्वात मोठी पूजा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पूजेसाठी सुमारे अठरा हजार हिंदी भाषिक भाविक उपस्थित होते. निरामय आरोग्य, समृद्धी तसेच नवसपूर्ती झाल्याने हिंदी भाषिक ही पूजा करतात.नाशिक विभागात राहणारे हिंदी भाषिक भाविक पूजेसाठी शहरात दाखल झाले होते. सुपामध्ये अननस, नारळ, केळी, दूध, दही, ओंब्या, मुळा, पेटता दिवा असे पूजेसाठी साहित्य भाविकांनी आणले होते. छटपूजेत फळांच्या व दुधाच्या नैवेद्याला महत्त्व असल्याने त्याचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. तसेच तांदळाचे लाडू, गव्हाचा हेकूवा, भोपळा याचा नैवेद्यही यावेळी सूर्यदेवतेला दाखविण्यात आला. सूर्यास्ताला पूजेची सुरुवात झाल्यानंतर नैवेद्याभोवती उसाचे पंडाल उभारण्यात येऊन सूर्यदेवतेची पूजा केली गेली. रात्रभर भाविकांनी भजन व देवाचे स्मरण करत छटपूजा केली. छटपूजेला महाभारतातील संदर्भ असल्याचेही सांगितले जाते. द्रौपदीने छटपूजेचे व्रत ठेवल्याची आख्यायिका आहे. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, नेपाळ या भागांत छटपूजा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तेथील बरेच नागरिक शहरात स्थलांतरित झाल्याने येथेही मोठ्या उत्साहाने पूजा करीत असल्याचे ते सांगतात. विवाहित व्यक्तीच ही पूजा करू शकतात. याप्रसंगी भोजपुरी व हिंदी गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी पूजा करण्यात येत असल्याने दिव्यांनी गोदाकाठचा परिसर झळाळून निघाला होता. हिंदी भाषिक राज कला सांस्कृतिक मंच, गणराज बहुद्देशीय सेवाभावी संस्था आदि संस्थांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
गोदाकाठी छटपूजेचा सोहळा
By admin | Published: October 29, 2014 11:50 PM