पंचवटी : नाशिक महापालिकेच्या पंचवटी घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत रामकुंड, लक्ष्मणकुंड, सीताकुंड, हनुमानकुंडात साचलेला गाळ, माती काढण्यात येऊन गुरुवारी (दि.२५) स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान नदीपात्रातील शेवाळ काढण्यात आले. दोन जेसीबी तसेच जेट मशीनच्या सहाय्याने कुंडातील दगड, गोटे, गाळ, कापड आदी कचरा काढण्यात आला. टाळकुटेश्वर ते गौरी पटांगणापर्यंत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.रामकुंडाच्या स्वच्छतेसाठी दुपारी लक्ष्मणकुंड, रामकुंड व हनुमान कुंडातून पाण्याचा प्रवाह सोडून देण्यात आला. त्यानंतर कुंडातील गाळ, माती स्वच्छ करण्याचे काम करण्यात आले. रामकुंड, हनुमान कुंडात जास्त प्रमाणात बोळके, गाळ, प्लॅस्टिक कचरा, कपडे, दगड, विसर्जित केलेल्या अस्थी साचलेले होते. दोन जेसीबींच्या साह्याने गाळ आणि कचरा कुंडातून बाहेर काढण्यात आला. कुंडामधील पाणी काढताच उघड्या पडलेल्या पायऱ्या शेवाळलेल्या दिसत होत्या. पायऱ्यांवर पाय ठेवणे धोकादायक असल्यामुळे पायºया स्वच्छ करण्यात आल्या. दोन स्वच्छता निरीक्षक, तीन मुकादम, २८ कर्मचारी व दोन अधिकारी मोहिमेत सहभागी झाले होते. जेसीबी आणि ट्रॅक्टर्सच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत गोदावरी स्वच्छता मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:26 AM