नाशिक : शहरातून वाहणाºया गोदावरी नदीची खोली वाढविण्याची सूचना आमदारांनी केली असून, रामकुंड परिसरात असलेला नदीचा तळ कॉँक्रीटमुक्त करावा, असेही सुचविले आहे. स्मार्ट सिटीअंर्तगत ही कामे घेण्याची शिफारस महापालिकेत झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे. स्मार्ट सिटीसंदर्भात नागरी सल्लागार समितीची बैठक सोमवारी (दि. २७) आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्या उपस्थितीत पार पडली. या समितीत तूर्तास खासदार हेमंत गोडसे आणि शहरातील आमदारांचा समावेश असून, त्यापैकी आमदार बाळासाहेब सानप आणि देवयानी फरांदे यावेळी उपस्थित होते. यावेळी स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देण्यात आल्यानंतर झालेल्या चर्चेत बोलताना आमदार सानप आणि फरांदे यांनी गोदावरी नदीच्या संदर्भात सूचना केल्या. गोदावरी नदीला दरवर्षी पावसाळ्यात पूर येतो. त्यामुळे नदीची खोली वाढवावी, अशी सूचना करण्यात आली. नदीची खोली वाढविल्यास पूररेषची तीव्रता कमी होईल आणि त्याचा परिसरातील नागरिकांना लाभ होईल, असे संबंधितांनी सांगितले. यापूर्वी २००८ मध्ये गोदावरीला महापूर आला होता. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झालेच; शिवाय शासनाच्या पाटबंधारे खात्याने पूररेषा आखल्याने कोट्यवधी रुपयांच्या मिळकती त्यात अडकल्या आहेत. पूररेषेत नवीन बांधकामांना परवानगी नाही. ज्यांना यापूर्वी परवानग्या दिल्या त्यादेखील अंतिमत: रोखण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदीचे तळ कॉँक्रिटीकरण काढण्याची सूचना देखील करण्यात आली आहे. गोदावरी नदीच्या तळ कॉँक्रिटीकरणाचे काम २००२-२००३ मध्ये कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने केले होते. आता हे कॉँक्रीट हटवून नैसर्गिक झºयांचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी होत आहे. याच बैठकीत खासदार हेमंत गोडसे यांनी शहरात फायबर आॅप्टीकलचे काम वेगाने पूर्ण करण्याची मागणी केली आहे. प्रारंभी आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी नागरी सल्लागार समितीच्या गठनामागील संकल्पना स्पष्ट केली. समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यावेळी उपस्थित होते.
रामकुंड परिसरात गोदावरी कॉँक्रीटमुक्तची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:27 AM