आॅनलाइन लोकमत / नाशिक : शनिवारपासून सातत्याने पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे गंगापूर धरणातून हजारो क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात होता. रविवारी दुपारी चार वाजेच्या दरम्यान नदीपात्रात सुमारे पंधरा हजार क्युसेक पाणी प्रवाहित झाल्याने पूर आला होता. मध्यरात्रीनंतर पावसाने विश्रांती घेतल्यामुळे विसर्ग कमी करण्यास सुरूवात झाली आणि पूर ओसरू लागला. सकाळीसाडे नऊ वाजेपासून विर्ग पाच हजार क्युसेकवर आला आहे. यामुळे धोक्याच्या पातळीवर दुधडी भरून वाहणारी गोदावरीचा रुद्रावतार कमी झाला आणि पूर ओसरल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. रामसेतू पूलाच्या खाली पाण्याची पातळी आली आहे. रविवारी मात्र चित्र वेगळेच होते अहल्यादेवी होळकर आणि संत गाडगे महाराज हे दोन पूल वगळता सर्व पूल पाण्याखाली गेले होते. सतर्कतेचा इशारा कायमगंगापूर धरणामधून विसर्ग जरी सध्या कमी केला असला तरी आपत्ती व्यवस्थापनाकडून सतर्कतेचा इशारा कायम आहे. गंगापूर धरण समुहाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कधीही वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने नदीकाठावरील रहिवाशांसह विक्रेत्यांना सतर्क राहण्याच्या सुचना दिल्या आहेत. समुहातून धरणात पाण्याची आवक वाढल्यास पुन्हा विसर्ग वाढ केली जाऊ शकते, असे सुत्रांनी म्हटले आहे.
गोदावरीचा पूर ओसरला; विसर्ग घटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 1:20 PM