पंचवटी : रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे गोदावरी नदीला पूर आला असून, पुराचे पाणी दुसऱ्या दिवशीही कायम आहे. पुरामुळे गंगाघाटावरील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, भाजीबाजारातही पुराच्या पाण्याने शिरकाव केल्याने बाजार पूर्णपणे ठप्प झाला आहे. सोमवारी दिवसभर संततधार सुरू असल्याने धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग केला जात होता. पुराच्या पाण्यात परिसरातील व्यावसायिकांच्या टपऱ्या अडकल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले. काही व्यावसायिकांनी दुपारी पाणी वाढण्याची सूचना मिळताच नदीपात्रालगत असलेल्या टपऱ्या सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्या. पुराच्या पाण्याने म्हसोबा महाराज पटांगणावरही शिरकाव केल्याने देवी मंदिराकडून नेहरू चौकाकडे जाणारा मार्ग बंद झाला होता. दुपारी पुराच्या पाण्याने दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पातळी गाठली होती. गोदावरीला आलेल्या पुरामुळे वाहनतळही पाण्याखाली गेले. त्यामुळे देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांना वाहने उभी करण्यासाठी जागा नसल्याने त्यांनी तसेच गंगाघाटावर धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या भाविकांनी रस्त्यातच वाहने उभी केल्याने गंगाघाट परिसरात वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. येत्या ४८ तासांत आणखी जोरदार वृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर परिसरातील व्यावसायिकांनी टपऱ्यांचे स्थलांतर केले. (वार्ताहर)
गोदावरीला पूर
By admin | Published: September 10, 2014 9:33 PM