नाशिक : शहर व परिसरात सकाळापासून हलक्या-मध्यम सरींची संततधार सुरु असली तरी मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत जोरदार पाऊस झाला. मागील २४ तासांत शहरात ३९.४ मिमी इतका पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. तसेच गंगापुर धरणाच्या पाणलोटक्षेत्रातसुध्दा पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस झाल्याने गंगापुर धरण शंभर टक्के भरल्याने बुधवारी (दि.२९) सकाळपासून टप्प्याटप्प्याने विसर्गाला सुरुवात करण्यात आली. दुपारी बारा वाजेपर्यंत १० हजार ५३१क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत करण्यात आल्याने गोदामाई सलग दुसऱ्या आठवड्यात दुथडी भरुन वाहताना नाशिककरांच्या नजरेस पडली. पूर तीव्रतेचे पारंपरिक मापक मानल्या जाणाऱ्या गोदापात्रातील दुतोंड्या मारुतीची मुर्ती मानेपर्यंत बुडाली. जिल्हाधिकारी यांनी गोदाकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
गोदावरीच्या पात्रात गंगापूर धरणातून बुधवारी सकाळी आठ वाजता ५ हजार क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. तासाभराने हा विसर्ग ७हजार क्युसेकपर्यंत वाढविला गेला आणि पुन्हा दोन तासांनी दहा वाजता तीन हजाराने वाढ करत गंगापूर धरणाचा विसर्ग १० हजार करण्यात आला. दुपारी बारा वाजेपर्यंत धरणातून पुन्हा ५२१क्युसेकची वाढ केली गेल्याने १० हजार ५३१क्युसेक इतका विसर्ग गोदावरीत दुपारी दोन वाजेपर्यंत सुरु होता.