नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या नाशिकच्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे गोदावरी पुरस्कार आज जाहीर करण्यात आले आहेत.
यंदा कोरोना काळात विशेष कार्य करून लोकसेवा केल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच सुप्रसिध्द नाट्य दिग्दर्शक आणि अभिनेता अतुल पेठे, विज्ञान क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रख्यात सैध्दांतीक, भौतिक शास्त्राचे प्राध्यापक प्रा. डॉ. हेमचंद्र प्रधान, चित्रकला क्षेत्रात योगदाना बद्दल डॉ. सुधीर पटवर्धन, प्रख्यात तबला वादक पं. सुरेश तळवळकर आणि अदम्य साहस दाखवल्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील सीताबाई काळु घारे यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे.
सीताबाई घारे यांनी बिबट्याशी झुंज दिली हेाती. प्रतिष्ठानचे विश्वस्त हेमंत टकले आणि कार्यवाह मकरंद हिंगणे यांनी आज नाशिक येथे पत्रकार परीषदेत ही माहिती दिली. २१ हजार रूपये रोख, सन्मान चिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. येत्या १० मार्च रोजी नाशिक मध्ये या पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे.
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने १९९२ पासून चित्रपट, नाटक, ज्ञान विज्ञान, चित्र शिल्प, क्रीडा- साहस, संगित नृत्य आणि लोकसेवा या क्षेत्रातील येागदानाबद्दल एक वर्षा आड पुरस्कार दिले जातात. आत्तापर्यंत ८८ मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.