ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 4 - सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांची स्नानासाठी गैरसोय होऊ नये, म्हणून शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च करून टाळकुटेश्वर ते थेट दसकपर्यंत नदीपात्रात काँक्रीटचे घाट बांधले. कुंभमेळा होऊन वर्षभराचा कालावधी लोटला असून या घाटांची दुरवस्था वाढली आहे. प्रशासनाने घाटांचा ‘घाट’ घातला; मात्र पुढील कुंभमेळ्यापर्यंत घाट शाबूत राहतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
महापालिका व जिल्हा प्रशासनाने वर्षभरापूर्वी गोदा प्रदूषणमुक्तीचा गवगवा केला होता. सध्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्थानिक मराठी कलावंतांपासून तर गोदाप्रेमींपर्यंत सर्वांकडून गोदा प्रदूषणमुक्तीचा सूर आळवला जात आहे. एकीकडे गोदा प्रदूषणमुक्तीचा नारा दिला जात असताना दुसरीकडे गोदापात्रातील काँक्रीट घाटांची होणा-या दैनावस्थेकडे दुर्लक्ष होत आहे.
सदर घाट जिल्हा प्रशासनाने देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेकडे हस्तांतरीत केले आहेत; मात्र या घाटांची देखभाल करण्यामध्ये महापालिकेला अद्याप यश आलेले नाही. घाटांची दुर्दशा वाढीस लागत असून काही ठिकाणी घाटांचा वापर हगणदारीसाठी केला जात आहे.
घाट बांधणीला पर्यावरणप्रेमींचा होता विरोध
काँक्रीट घाट बांधणीला त्यावेळी काही पर्यावरणप्रेमी संस्थांकडून आक्षेप घेण्यात आला होता. गरज नसतानाही सरसकट दहा ते बारा किलोमीटरपर्यंत काँक्रीट नदीपात्रात ओतून घाट बांधल्यामुळे नदीचे नैसर्गिक जलस्त्रोत धोक्यात आल्याचा दावा त्यावेळी आपलं पर्यावरण संस्थेने केला होता. या घाटांचे काम थांबवावे अथवा अखंड घाट बांधणे टाळावे, यासाठी मानवी साखळीच्या रुपाने या संस्थेने आंदोलनही त्यावेळी पुकारले होते.
खासदार गोडसेंनाही पडला विसर
खासदार हेमंत गोडसे यांनी घाटांची पाहणी करुन या घाटांच्या मध्यभागी टप्प्याटप्प्यांवर सुशोभीकरण करून गोदा पर्यटनाची संकल्पना विकसीत करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचेही त्यांनी पाहणी दौ-याप्रसंगी सांगितले होते; मात्र कुंभमेळा होऊन वर्षभराचा कालावधी उलटूनदेखील अद्याप या घाटांचे नवनिर्माण महापालिका किंवा राज्य सरकारमार्फत होऊ शकलेले नाही. गोडसे यांच्याकडूनही अद्याप याबाबत कुठल्याही प्रकारे शासनदरबारी याप्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला नाही.
महापूराचा जोरदार फटका
गेल्या वर्षी पावसाळ्यात महापूराचा जोरदार फटका नाशिकला बसला. त्यावेळी हे सर्व घाट आठवडाभरापेक्षा अधिक कालावधीपर्यंत पाण्याखाली बुडालेले होते यामुळे घाटांची रया गेली. काँक्रीट घाटांमुळे गोदामाईचा श्वास आवळला गेल्याने गोदामाई कोपली व पुराच्या पाण्याने उसळी घेऊन धोक्याची पातळी ओलांडल्याने नदीपात्राचा विस्तारही वाढल्याचे महापूरामध्ये नाशिककरांनी याचि देही याचि डोळा बघितल्याचे पर्यावरणप्रेमींकडून सांगण्यात आले होते.
सध्या घाटांची दुर्दशा
महापालिके कडे सोपविण्यात आलेल्या कोट्यवधींच्या नवीन घाटांच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी पेलण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. घाटांची ‘माती’ होत असून घाटांचे सुशोभिकरण तर लांब राहिले; मात्र साधी स्वच्छतादेखील केली जात नसल्याने घाट रामभरोसे आहे.