इगतपुरी : इगतपुरी येथील मध्य रेल्वेच्या टिटोली यार्डांतर्गत रेल्वे प्रशासनातर्फे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत असल्याने शनिवार दि. २८ मे पासून गोदावरी व जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. या कामामुळे काही गाड्या कमी अंतरापर्यंत धावणार असून अन्य गाड्या उशिराने धावण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात तांत्रिक दुरुस्तीचे काम २८ मे ते १ जून या कालावधीमध्ये केले जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे गाडी क्रमांक ०१२०२/१ मनमाड-मुंबई-मनमाड गोदावरी स्पेशल ट्रेन दिनांक २८ मे ते २ जून दरम्यान दोन्ही दिशेने धावणार नाही. त्याचप्रमाणे गाडी क्रमांक १२०७१ जालना-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेस दिनांक ३० आणि ३१ मे रोजी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. तसेच परतीची १२०७२ मुंबई -जालना जनशताब्दी एक्स्प्रेस दिनांक ३१ मे आणि १ जून रोजी रद्द करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भुसावळ ते इगतपुरीदरम्यान धावणारी मेमू गाडी या कालावधीमध्ये इगतपुरीपर्यंत न येता नाशिकरोड स्टेशनपर्यंतच धावणार आहे. या बदलांमुळे चार दिवस चाकरमानी, विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात नाशिकरोड रेल्वे स्थानकातून मुंबईला जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेस नियंत्रित करून चालवण्यात येणार असल्याने त्या एक ते दोन तास उशिराने धावण्याची शक्यता आहे, तर मुंबईहून नाशिककडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या मेल व एक्स्प्रेस नाशिकरोडपर्यंत एक ते दोन तास उशिराने धावण्याची शक्यता आहे. नाशिकरोडनंतर या गाड्या सुरळीत जातील. मेगाब्लॉकच्या काळात सुमारे १५२ रेल्वे गाड्या विस्कळीत होण्याची शक्यता आहे.