ठळक मुद्देअग्निशामक केंद्राकडून गोदाकाठालगत सतर्कतेच्या सूचनादुतोंड्या हनुमानाच्या मुर्तीच्या पायाला पाणी लागले
नाशिक : मागील दिड महिन्यांपासून नाशिककरांना पावसाच्या समाधानकारक वर्षावाची प्रतीक्षा होती. गेल्या बुधवारी पावसाचे जोरदार ‘कमबॅक’ झाल्यानंतर पुन्हा गती मंदावली होती. रिपरिप शुक्रवारपर्यंत सुरू होती; मात्र शनिवारी संध्याकाळपासून पावसाचा जोर शहरासह जिल्ह्यात वाढल्याने गंगापूर धरणाचा जलसाठा ६० टक्क्यांवर पोहचला व रविवारी (दि.१५) गोदावरीच्या पातळीतही वाढ झाल्याचे चित्र होते. रविवारी पहाटेपर्यंत शहरात जोरदार पाऊस झाला. दिवसभर पावसाची संततधार कायम होती.
रविवारपासून पावसाला दमदार सुरूवात झाली. शहरास जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे ‘वीकेण्ड’ला वर्षासहलीसाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांचा हिरमोड झाला नाही. शनिवारी संध्याकाळपर्यंत शहरात केवळ दोन मिमी इतका पाऊस पडला; मात्र रात्री साडेआठवाजेपर्यंत पावसाचे प्रमाण १४ मि.मीवर पोहचले होते. मध्यरात्रीनंतर पुन्हा पावसाने जोर धरला. रविवारी पहाटेपर्यंत शहरास जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू होता. दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील जनजीवनावर प्रभाव पडला. दमदार हजेरीचा दिवस पावसाने रविवार निवडल्यामुळे चाकरमान्यांसह विद्यार्थीवर्गाचे हाल झाले नाही. सकाळपासून शहरातील रस्ते ओस पडलेले होते. पावसामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळल्याने बाजारपेठांमध्येही शुकशुकाट होता. दुपारी तीन वाजेपासून पावसाने संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अल्पशी विश्रांती घेतली. संततधार उघडल्याने नागरिक काही प्रमाणात रस्त्यावर आले. सकाळपर्यंत शहरात ५२ मि.मी व जिल्ह्यात सरासरी पावसाचे प्रमाण ३१.३२ मि.मी इतके होते. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण कायम राहिल्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली होती. सकाळी ६२ टक्क्यावर असलेला धरणसाठा दिवसभरात अधिक वाढला. जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद इगतपुरी तालुक्यात झाली. देवळा, नांदगाव, बागलाण, मालेगाव या तालुक्यांना जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे.गोदावरीच्या पातळीत वाढ झाल्याने पंचवटी अग्निशामक केंद्राकडून गोदाकाठालगतच्या विक्रेत्यांना व नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. देवमामलेदार मंदिराचे पटांगण पाण्याखाली गेले होते. नाशिककरांचे पारंपरिक पर्जन्यमापक असलेल्या दुतोंड्या हनुमानाच्या मुर्तीच्या पायाला पाणी लागले होते. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा वरुणराजाची कृपादृष्टी उशिराने झाल्यामुळे गोदामाईचे खळाळलेले रुप नाशिककरांना विलंबाने पहावयास मिळाले.
जिल्ह्यातील पाऊस असा (मि.मीमध्ये)नाशिक : ५२.१/इगतपुरी : १५२.०/त्र्यंबकेश्वर : ९९/दिंडोरी : २०/पेठ : ८७/निफाड ८.४/सिन्नर : ५.२/चांदवड : २.२/देवळा : ०.०/येवला : २.०/नांदगाव : ०.०/मालेगाव :०.०/बागलाण : ०.०/कळवण : ५.०/सुरगाणा : ३६.५, कळवण ५.०