नाशिक : सिन्नर तालुक्यातील सोमठाण येथे नदीच्या पात्रातून सुरू असलेल्या बेकायदा वाळू उपशाबाबत सोशल माध्यमातून जिवंत पुरावे व्हायरल होत असताना मालेगाव येथे पाण्याअभावी उजाड झालेल्या गिरणा नदीपात्रात दिवसाढवळ्या मालट्रकमधून वाळूची चोरी होत असल्याचे उघड झालेले असताना महसूलने डोळ्यावर बांधलेल्या पट्टीमुळे वाळूमाफियांचे चांगलेच फावले आहे. राजकीय वरदहस्ताने केल्या जात असलेल्या वाळू चोरीत आता महसूल विभागालाही सहभागी करून घेण्यात आले असून, त्यामुळेच तलाठी ते जिल्हाधिकारी अशा सर्वांनीच या प्रश्नी सोयीस्कर भूमिका घेतली आहे. सोमठाणे येथील वाळू उपशाबाबत अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या असून, त्यातूनच महसूल विभागाचा या संपूर्ण प्रकरणातील सहभाग उघडकीस आला आहे.इतका साठा होत असताना तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार व प्रांत अधिकाऱ्यांना त्याची खबर लागू नये याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, या वाळू साठ्याच्या लिलावाला अनुमती देणाºया जिल्हा प्रशासनालादेखील त्याबाबत संबंधितांना जाब विचारावासा वाटला नाही. महसूल विभागाची या संपूर्ण प्रकरणात संशयास्पद भूमिका असतानाच, सदरच्या साठ्याचा लिलाव सिन्नर तालुक्यातील सत्ताधारी पक्षाच्या एका माजी लोकप्रतिनिधीच्या नातेवाइकानेच घ्यावा ही बाबदेखील योगायोगच म्हणावी लागेल. सोमठाणच्या वाळू ठिय्यातून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात असल्याची तक्रार होत असताना महसूल विभागाने त्याबाबत चुप्पी तर साधलीच, परंतु या वाळू ठिय्याकडे वक्रदृष्टी करून पाहणाºया वाळूमाफियांच्या गाड्या पकडून त्यांचा आवाज बंद करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे महसूल खात्याच्या सहमतीशिवाय सदरचा व्यवसाय होत नसल्याची होणारी चर्चा खरी ठरू लागली आहे. असाच प्रकार मालेगावच्या गिरणा नदीपात्रातही दिवसाढवळ्या दिसू लागला आहे. पाण्याअभावी कोरड्याठाक पडलेल्या गिरणा नदीवरील पुलालालागूनच वाळू उपसा करून एकामागोमाग ट्रक भरले जात आहेत. परंतु त्यावरही कारवाई करण्यात महसूल खात्याचे हात धजावलेले नाहीत. एकीकडे राजकीय वरदहस्तांना मोकळीक, दुसरीकडे आपल्याच खात्यातील काही अधिकाºयांवर मेहेरनजर दाखविणाºया जिल्हा प्रशासनाची भूमिकाच संशयाच्या भोवºयात सापडली आहे.गोदावरीला लागूनच असलेल्या सोमठाणे येथील उपसा ठिकाणी सुमारे दोन हजार ब्रासचा अनधिकृत साठा असल्याचा अहवाल सिन्नर तहसीलदाराने जिल्हा प्रशासनाला पाठवून त्याच्या जाहीर लिलावाची अनुमती मिळविली असली तरी, सुमारे दोन हजार ब्रास वाळू याठिकाणी कोणी व कशासाठी साठा करून ठेवला त्याचा खुलासा मात्र केलेला नाही.
गोदावरी, गिरणाच्या वाळू चोरीत महसूलचा संबंध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 1:27 AM