नाशिक - गोदावरी नदीच्या प्रदुषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेक प्रयत्न केल्यानंतर शासकिय यंत्रणा हालली असली तरी आता जनप्रबोधन या महत्वाच्या विषयाला नमामि गोदा फांऊडेशनने हात घातला आहे. या फाऊंडेशनने गोदाकाठच्या नागरीकांना नदीचे महत्व आबादीत राखण्यासाठी वारीचा उपक्रम सुरू केला आहे. गेल्यावर्षी गोदावरीचे उगमस्थान असलेली गोदावरी नदीची वारी रामकुंडा पर्यंत नेण्यात आली होती. यंदा ती कोपरगावपर्यंत नेऊन नदीचे महत्व अधोरेखीत करण्यात आले. गोदावरीचे केवळ प्रदुषण रोखणे महत्वाचे नसून संवर्धन देखील तितकेच महत्वाचे आहे, असा संदेश देण्यात आला. यासंदर्भात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेश पंडित यांच्याशी लोकमतने संवाद साधल्यानंतर त्यांनी गोदावरीची चळवळ ही जन चळवळ व्हावी अशी इच्छा व्यक्त केली.
प्रश्न : गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा का हाती घेतला.पंडित: दक्षिण गंगा गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी यापूर्वी प्रयत्न केले. प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलने करण्यात आली. त्यात यश न आल्याने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. त्यानंतर कुठे यंत्रणा हलल्या, परंतु त्यावरच अवलंबून न राहता लोकसहभाग वाढविण्यासाठी आता वारी गोदावरीची उपक्रम सुरू केला आहे.
प्रश्न : वारी गोदावरीची ही संकल्पना कशी आहे आणि त्याला कशी सुरुवात झाली.पंडित : गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी नमामि गोदा हे फाउंडेशन स्थापन करण्यात आले असून, त्या माध्यमातून अनेक पर्यावरणप्रेमी काम करीत आहेत. गोदावरीवर प्रेम करणारे चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षीरसागर, किरण भालेराव यांच्यासारख्या कलावंतांचादेखील त्यात सक्रिय सहभाग आहे. गोदावरी नदीच्या उगमापासून ती समुद्रातील सहभागापर्यंतच्या भागातून नदी जात असताना प्रदूषणमुक्त करण्यासाठी वारी गोदावरी ही संकल्पना गेल्यावर्षी आखण्यात आली. कचरा, प्लॅस्टिक, निर्माल्य न टाकणे तसेच कपडे आणि गाड्या न धुणे यांसारख्या माहितीबरोबरच सांडपाणी मिसळण्यास प्रतिबंध करणे यासाठी नागरिकांना जागरूक करणे हा वारीचा प्रमुख भाग आहे.
प्रश्न : पहिल्या टप्प्यात प्रतिसाद कसा होता?पंडित : गोदावरीचे उगमस्थान म्हणजे ब्रह्मगिरी ते रामकुंडापर्यंत पहिल्या टप्प्यात वारी करण्यात आली. अर्थात ही वारी म्हणजे केवळ पारंपरिक वाऱ्यांसारखी नाही तर त्यात केवळ गोदाकाठच्या नागरिकांना भेटून त्यांना नदीचे महत्त्व सांगणे आणि प्रदूषण कसे टाळता येतील या विषयावर संवाद साधला जातो. जलतज्ज्ञ राजेंद्रसिंंह हे स्वत:च पहिल्या टप्प्यात सहभागी होते.
प्रश्न : वारीचा दुसरा टप्पा कसा होता? प्रतिसाद कसा मिळाला.पंडित : रामकुंड ते कोपरगाव हा वारीचा दुसरा टप्पा दोनच दिवसांपूर्वी पार पडला. यावेळी जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह उपस्थित होते. त्यांनीच यात्रेचे स्वागत केले. नाशिकमध्ये गेल्यावर्षी झालेल्या टप्प्यात महाविद्यालयीन युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तितकी संख्या नसली तरी कोपरगाव येथेही चांगला प्रतिसाद मिळाला आणि लोकांनी गोदावरीच्या प्रदूषणमुक्तीच्या कार्यात सहभागी होण्याची तयारी दर्शविली आहे. वारीत हेच अपेक्षित आहे.
प्रश्न : पुढील टप्पा कसा असणार आहे?पंडित : वारीचा तिसरा टप्पा पैठणपर्यंत असणार आहे आणि पुढे टप्प्याटप्प्याने तो आंध्र प्रदेशापर्यंत नेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न केले जात आहेत. वारीचा अनेक ठिकाणी सकारात्मक परिणाम दिसून येत असून, नागरिक सजग झाले आहेत. हे मोठे यश आहे. स्थानिक नागरिक आणि शासकीय यंत्रणा एकत्र आल्यास गोदावरी नदीची प्रदूषणमुक्ती सहज शक्य आहे.