नाशिक : ‘आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास’ अशी परिस्थिती यंदा पावसाअभावी नाशिक जिल्ह्यावर ओढवलेली असताना त्यात समन्यायी पाणी वाटपाचा आधार घेत गंगापूर धरणातून पाणी पळविण्याचा मराठवाड्याकडून होणारा प्रयत्न पाहता आगामी निवडणुकीत नाशिक व नगर जिल्ह्यात ‘गोदावरी’चे पाणी पेटण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांमध्ये पिके करपून, पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्यामुळे गंगापूरचे पाणी अन्य जिल्ह्यासाठी सोडल्यास तीन वर्षांपूर्वीच्या राजकीय तणावाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.मराठवाड्यातील जायकवाडी धरणात १७२ दशलक्ष घनफूट पाण्याची कमतरता असल्यामुळे समन्यायी पाणी वाटपानुसार नाशिक व नगर जिल्ह्यातील धरणांमधून किमान ६ टीएमसी पाणी सोडण्याचे प्रयत्न गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सुरू झाले आहेत. सोमवारी या संदर्भात झालेल्या बैठकीत गोदावरी पाटबंधारे महामंडळाने नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणातील पाण्याची आकडेवारी जाणून घेतली. त्यात जायकवाडीची तूट भरून काढण्यासाठी पाणी सोडावे लागेल, असे महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी ठामपणे सांगितले व प्रसंगी त्यासाठी लवादाकडे तक्रार दाखल करण्याचेही सूतोवाच केले आहे. त्यामुळे पाणी सोडण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत १३ टक्के तर गंगापूर धरणात ११ टक्के पाण्याची कमतरता यंदा निर्माण झाली आहे. गंगापूरमध्ये ८८ टक्के साठा असून, जिल्ह्यातील धरणांमध्ये ७७ टक्के साठा आहे. आॅक्टोबरमध्ये होणारे धरणातील पाण्याचे आरक्षण अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिका, रेल्वे आदींसाठी जुलै अखेरपर्यंत पाण्याची तजवीज केल्यानंतर धरणातील उर्वरित पाणी सिंचनासाठी देण्याची तरतूद आहे. यंदा खरीप पिकासाठी अखेरचे आवर्तन न मिळाल्यामुळे तसेच परतीचा पाऊस न आल्यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास त्याचा या धरणावर अवलंबून असलेल्या तालुक्यांमध्ये राज्य सरकारच्या विरोधात वातावरण पेटण्याची चिन्हे आहेत.राज्यात सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्याच वर्षी सन २०१५ मध्ये जायकवाडी धरणासाठी नगर, नाशिकमधून १२ टीएमसी पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे भाजपा सरकारविरोधात सर्वपक्षीयांनी आंदोलन केले होते. लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असून, यंदा अपुºया पाण्यामुळे जनता होरपळून निघत असताना हक्काचे पाणी पळविल्यास त्याचा विरोधकांकडून निवडणुकीत सत्ताधाºयांच्या विरोधात प्रचार केला जाणार आहे.
आगामी निवडणुकीत गोदावरीचे पाणी पेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2018 1:22 AM