नाशिक : गोदावरी नदीमध्ये गंगापूर धरणातून विसर्ग सुरू असल्याने गंगाघाटावरील पाण्याने दुतोंड्या मारुती मूर्तीच्या कमरेपर्यंतची पातळी ओलांडली होती. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत धरणातून गोदापात्रात चार हजार ३४२ क्यूसेक विसर्ग सुरू होता; त्यानंतर वाढ करण्यात आली आणि संध्याकाळपर्यंत पाच हजार ९३१ क्यूसेकचा विसर्ग सुरू होता. दुपारी ४ वाजेपर्यंत अहिल्यादेवी होळकर पुलाखालून सात हजार ८३० क्यूसेक पाण्याचा प्रवाह सुरू होता. पुरामुळे गंगाघाटावरील मंदिरे पाण्याखाली सापडल्याने परिसरात व्यावसायिकांना पुन्हा पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. काठ परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले. पुरामुळे सांडव्यावरच्या देवी मंदिरापासून ते गाडगे महाराज पुलाकडे जाणाऱ्या म्हसोबा महाराज पटांगणावर पुराचे पाणी असल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद झालेला होता. रविवारी दुपारी रामकुंड पुराच्या पाण्याने भरगच्च झाल्याने विविध धार्मिक विधी करण्यासाठी आलेल्या भाविकांना नदीकाठावरच धार्मिक विधी करावे लागले. पूर्वीच्या भाजीबाजारातही पाण्याचे साम्राज्य असल्याने परजिल्ह्यातून येणाºया भाविकांना आपापली चारचाकी वाहने गंगाघाट परिसरात मिळेल त्या जागेवर उभी करावी लागल्याचे चित्र दिसून आले.
गोदावरीच्या पाणी पातळीमध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 1:08 AM