नाशिक : सोमवारी पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आल्याने गंगापूर धरणातून सातत्याने विसर्गात वाढ केली जाऊ शकते. दुपारी साडेबारा वाजेपासून गंगापूर धरणातून २ हजार २८४ क्युसेक इतका विसर्ग गोदापात्रात तर दारणामधून ७ हजार ४१० क्युसेकचा विसर्ग नदीपात्रात करण्यात आला. त्यामुळे गोदावरी व दारणा नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाने दिला आहे. विशेषत: सात दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी जाताना नदीकाठापासून सुरक्षित अंतरावर थांबावे, गणेशमुर्ती कृत्रिम तलावात विसर्जन करून दान करावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तीन दिवसांपुर्वीच गणेश विसर्जनासाठी दारणा नदीत उतरलेला युवक पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याची घटना घडली. त्या युवकाचा अद्याप थांगपत्ता लागू शकलेला नाही.
सुमारे वीस दिवसांपासून पावसाने शहरासह जिल्ह्यात उघडीप दिली होती. मागील दोन दिवसांपासून शहरात ढगाळ हवामान कायम असून रविवारी रात्रपासून पावसाला सुरूवात झाली; मात्र सोमवारी पहाटेपासून शहरातदेखील पावसाच्या सरींनी जोर धरला. पहाटेपासून शहरात मध्यम स्वरूपाच्या सरींची संततधार सुरू झाली. तसेच जिल्ह्यातील इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू झाल्याने दारणा, गंगापूर धरण १०० टक्के भरले असल्यामुळे तत्काळ पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू केला गेला. दोन दिवसांपासून गंगापूर धरणातून ६०० क्युसेक इतके पाणी गोदापात्रात सोडले जात होते; मात्र सोमवारी दुपारी २ हजार २०० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविला गेला आहे. कारण धरणसाठा १०० टक्के झाला असून पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्गामध्ये अजून वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नदीकाठालगत सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.लाडक्या बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेला सात दिवस पूर्ण झाले आहे. ७ दिवसांकरिता विराजमान झालेल्या बाप्पांना निरोप देण्यासाठी काही भाविकांची गोदाकाठ, दारणाकाठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता या परिसरात अग्निशमन दल, जीवरक्षक दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले आहे. जे भाविक सात दिवसांच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीकाठावर जाणार आहे, त्यांनी लहान मुले, महिला यांना नदीकाठापासून सुरक्षित अंतरावर थांबवावे, तसेच पाण्यात खोलवर उतरणे टाळावे, गणेशमुर्ती नदीकाठावरूनच विसर्जित करावी, अन्यथा कृत्रिम तलावाचा पर्याय स्विकारावा. जेणेकरून पर्यावरणपुरक गणेशोत्सव आणि सुरक्षा जोपासण्यास मदत होईल, असे आवाहन महापालिका, जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाने केले आहे.