नाशिक : रशिया, तुर्कमेनिस्तान आणि लाटीव्हीया या तीन देशांतून आलेल्या चित्रकारांच्या गटाने शुक्रवारी दुपारी गोदाकाठावर बसून गंगेच्या पात्रासह परिसराचे विविधरंगी चित्रण त्यांच्या कॅनव्हासवर उमटवले. त्याआधी या कलाकारांनी सकाळी पांडवलेणी परिसरात जाऊन तेथील मूर्ती, कलाकुसर आणि लेण्यांच्या परिसराला कागदावर चित्ररूपात जिवंत केले.भारताच्या श्रेयांसी इंटरनॅशनल आणि सेंट पीटर्सबर्ग सेंटर फॉर ह्युमॅनेटीरीयन या संस्थांनी आयोजित केलेल्या आर्ट इको अंतर्गत कलाकारांच्या या आदानप्रदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत या तीन देशांचे नऊ व्यावसायिक चित्रकार आणि भारताचे तीन व्यावसायिक चित्रकार गंगेवर चित्रणासाठी जमले होते.भारतासह देश-विदेशात धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून नाशिकची ओळख असल्याने विदेशातील अनेक कलाकारदेखील नाशिकमधून धर्म आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी नाशिकला येत असतात. त्याचप्रमाणे नाशिकला गुरुवारीच या चित्रकारांचे एक पथक दाखल झाले होते.विविध भागांचे चित्रिकरणया चित्रकारांनी प्रारंभी गोदाघाटाचा संपूर्ण परिसर पायी फिरून न्याहाळला. त्यानंतर काहींनी यशवंतराव महाराज पटांगणावर बसून तर काहींनी जुन्या नाशिकमधील गल्ल्यांमध्ये फिरून या चित्रकारांनी नाशिकच्या विविध भागांचे चित्रण त्यांच्या कॅनव्हासवर केले. त्यावेळी त्यांचे चित्रण न्याहाळण्यासाठीदेखील आसपासच्या नागरिकांनी गर्दी केली होती. या पथकासमवेत नाशिकचे चित्रकार शिशिर शिंदे, ललित साळुंखे, सूर्या गोस्वामी, श्रेयांसी मनू यांच्यासह चित्रकला महाविद्यालयाचे सूर्यवंशी, तसेच चित्रकला महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.
रशियन कलाकारांनी चितारली गोदामाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2020 12:03 AM