नाशिक : जुलै २०१६ मध्ये महापुरात उद््ध्वस्त झालेल्या ‘गोदापार्क’चे नव्याने डागडुजीचे काम सुरू झाले असून, महापुरात पुन्हा मोठे नुकसान होणार नाही, यादृष्टीने नव्याने डिझाइन तयार करण्यात आले आहे. रिलायन्स कंपनीच्या सीएसआर उपक्रमांतूनच सदर काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून चांदशी शिवारात सुयोजित व्हेरिडीएनलगत साकारण्यात आलेला सुमारे ९०० मीटरचा हा गोदापार्क पुन्हा झळाळी घेण्याच्या तयारीत आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या संकल्पनेतील ‘गोदापार्क’ची नवलाई अनुभवण्याची प्रतीक्षा आता नाशिककरांना लागून आहे. सन २०१६ मध्ये जुलै महिन्यात आलेल्या महापुरात गोदापार्कची वाताहत झाली होती. गोदापार्कवरील लॉन्ससह फरशा उखडल्या होत्या, तर विद्युत दीपाचे खांब कोलमडून पडले होते. गॅबियन वॉलही वाहून गेली होती. राज ठाकरे यांनी रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून सदर गोदापार्कची उभारणी केलेली होती. करारनाम्यानुसार, संबंधित कंपनीकडेच या गोदापार्कचे देखभाल-दुरुस्तीचे काम १५ वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आलेले आहे. त्यामुळे, महापुरात गोदापार्कची वाताहत झाल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचेही दायित्व कंपनीवरच येऊन पडले. गोदापार्कची महापुरात वाताहत झाल्यानंतर पार्कची पुन्हा उभारणी करण्यासंबंधीचे निर्देश महापालिकेने कंपनीला दिल्याचे सांगितले जाते. परंतु, पावणेदोन वर्षांचा कालावधी लोटल्यानंतर आता रिलायन्स कंपनीने गोदापार्क पुन्हा साकारण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीच्या एजन्सीने वाताहत झालेल्या गोदापार्कची पाहणी करत यापुढे महापुरापासून त्याला धोका पोहोचू नये, यादृष्टीने नव्याने डिझाइन तयार केले आहे. दुरुस्तीचे काम मोठे आहे. उखडलेल्या फरशांच्या ठिकाणी ग्रीनलॉन्स बसविण्याबरोबरच विद्युत पोल हे पुराच्या प्रभावाखाली येणार नाही, अशा ठिकाणी बसविण्यात येणार आहेत. पुराच्या पाण्याला अवरोध करतील अशा पद्धतीने भिंतीची रचना केली जाणार आहे. महापूर आला तरी, कमीत कमी नुकसान होईल, अशी दक्षता नव्या रचनेत केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.नुकसानीचा धोका कायमनाशिकचा चेहरामोहरा बदलावा, शहराच्या सौंदर्यात भर पाडणारे प्रकल्प उभारावेत, याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांची तळमळ आणि हेतूविषयी तिळमात्र शंका नव्हती. महापालिकेला आर्थिक झळ न लागू देता उद्योजकांच्या सामाजिक पुढाकाराने जे प्रकल्प उभे करण्यात आले, त्यामुळे शहराच्या वैभवात भरच पडली आहे. परंतु, गोदापार्कसारख्या प्रकल्पांच्या टिकाऊपणाबद्दल नाशिककरांच्या मनात यापूर्वीही संभ्रम होता आणि यापुढेही तो कायम राहणार आहे. त्यामुळे गोदापार्कची आता नव्याने होणारी रचनाही दुरुस्तीच्या पलीकडे नाही. त्यामुळे भविष्यात धोका कायम आहे. सत्तांतरानंतर प्रकल्पांची परवडमनसेची पाच वर्षांची सत्ता मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत संपुष्टात आली. मनसेच्या नगरसेवकांची संख्या ४० वरून पाचवर आली. मनसेच्या सत्ताकाळात साकारण्यात आलेल्या प्रकल्पांची आता महापालिकेतील सत्तांतरानंतर परवड सुरू आहे. गोदापार्कबाबत सत्ताधारी भाजपा गंभीर नाही. मनसेच्या सत्ताकाळात पहिली अडीच वर्षे सत्तेत सहभागी होणाऱ्या भाजपाने गोदापार्ककडे पूर्णत: दुर्लक्ष केलेले आहे. मनसेचे उरलेसुरले पाच शिलेदारही मौन बाळगून आहेत. त्यांच्याकडूनही त्याबाबत पाठपुरावा होताना दिसून येत नाही. त्यामुळेच मनसेच्या सत्ताकाळात उभ्या राहिलेल्या वनौषधी उद्यान, होळकर पुलावरील वॉटर कर्टन यांची परवड सुरू आहे.