नाशिक- लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या फेरी अखेरीस सुमारे २२ हजारांनी शिवसेनेने उमेदवार हेमंत गोडसे यांनी आघाडी घेताच, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नाशिकरोड येथील उड्डाणपुलाखाली जल्लोष केला. तर देशपातळीवर भाजपा आघाडीवर असल्याने आणि नाशिकमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी ढोल ताशे लावून आनंद व्यक्त करण्यात येत असून पेढे वाटपही सुरू आहे.
यंदाची लोकसभा निवडणूक अत्यंत अटीतटीची होती. नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ, भाजपाचे बंडखोर अॅड. माणिकराव कोकाटे त्याच प्रमाणे वंचीत बहुजन आघाडीचे पवन पवार यांच्याशी कडवी लढत झाली. निकालाच्या अगोदर पर्यंत कोणीही निकालाचे अंंदाज बाधणे कठीण होते. निकालाच्या सुरूवातीला मात्र दोन्ही जागांवर कमी जास्त होत होते. परंतु तिस-या फेरी अखेर हेमंत गोडसे यांनी २२ हजार मतांची आघाडी घेतल्यानंतर मात्र शिवसेनेला धीर धरवला नाही. नाशिकरोड येथे शिवसेनेच्या कार्यालयाच्या जवळ म्हणजेच स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलाच्या जवळ जल्लोष सुरू केला. ढोल ताशा आणि डीजेच्या तालावर नाचणा-या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा जयजयकार करतानाच नाशिकरोड येथे विविध ठिकाणी नाशिककर मतदारांचे जाहिर आभार असे पोस्टर देखील चिटकवण्यात आले.
दरम्यान, भाजपा कार्यालयात मोठा स्क्रीन लावण्यात आला असून सकाळपासून हळूहळू कार्यकर्ते पक्ष कार्यालयात जमू लागले. त्यानंतर निकालात देशात सर्वत्र भााजपाची सरशी दिसु लागताच कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. सिडको भागात भाजपाचे उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकर यांच्या कार्यालयात सामुहीक निकाल पहाणी बरोबरच जल्लोष सोहळ्याच आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी देखील भाजपाच्या वतीने कार्यकर्त्यांना पेडे भरूवून आनंद व्यक्त केला.