ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आशा कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करून त्यांच्याकडून घरोघर जाऊन कोरोनाबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे.ठाणगाव आरोग्य क ेंद्रांतर्गत १९ गावांचा समावेश असून, यात अनेक उपकेंद्रांचा समावेश आहे. ठाणगाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर.डी. धादवड यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी परिसरातील सर्व आशा कार्यकर्त्यांना एकत्र बोलावून कोरोनाबाबत जनजागृती करण्यासंबंधी सूचना केल्या. त्या पद्धतीने सर्व आशा कार्यकर्त्या महिला घरोघरी जाऊन कोरोनाबाबत सार्वजनिक ठिकाणी थूंकू नये, वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत. सर्दी किंवा फ्लूसारखी लक्षणे आढळल्यास रुग्णालयाशी संपर्क साधावा, अशा सूचना देण्यात येत आहे.कोरोना या विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही यासाठी ठाणगाव केंद्रासह पंधरा ग्रामपंचायतींनी पुढाकार घेतला आहे. यावेळी या कार्यशाळेस आरोग्य सेवक एस. जी. काळे, एस. डी. कहांडोळ, नितीन घोटेकर, शारदा शेलार, सुनीता भागवत, शांता शेळके यांच्यासह परिसरातील आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी कोरोनाच्या भीतीने डगमगून न जाता आपल्या पातळीवर स्वच्छता राखावी. प्रत्येकाने आवश्यक काळजी घ्यावी. गर्दी टाळावी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. सर्दी, ताप, खोकला असल्यास ताबडतोब आरोग्य केंद्रात संपर्कसाधावा.- डॉ. आर. डी. धादवड,वैद्यकीय अधिकारी, ठाणगाव