Gokul Zirwal ( Marathi News ) : राज्यात काही दिवसातच विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार आहे, सर्व पक्षीयांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही तयारी सुरू केली आहे. आजपासून नाशिकपासून राष्ट्रवादी काँग्रेसची 'जनसन्मान यात्रा' सुरू होणार आहे. या यात्रेला पक्षातील दिग्गज नेत्यांची हजेरी असणार आहे. पण, आमदार नरहरी झिरवाळ यांचा मुलगा गोकुळ झिरवाळ उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहेत. काही दिवसापूर्वी गोकुळ झिरवाळ खासदार शरद पवार यांच्या अका कार्यक्रमात उपस्थित होते,यामुळे ते राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. दरम्यान, आज अजित पवार यांच्या 'जनसन्मान यात्रेत' सहभागी होणार नसल्याने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
आज अजित पवार यांची जनसन्मान यात्रा दिंडोरी येथे असणार आहे, पण या यात्रेत गोकुळ झिरवाळ उपस्थित नसणार आहेत. गोकुळ झिरवाळ तुतारी चिन्हावर लढण्यावर ठाम आहेत.त्यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे मुलाखतही दिली आहे, मी अजूनही शरद पवार यांच्यासोबत असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी दिली आहे. या यात्रेत सहभागी होणार नसल्याचेही त्यांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे. पण, काही दिवसापूर्वी नरहरी झिरवाळ यांनी आम्ही अजित पवार यांच्यासोबतच राहणार असल्याचे सांगितले होते.
नरहरी झिरवाळ यांनी मुलाला दिला होता सल्ला
काही दिवसापूर्वी नरहरी झिरवाळ दिंडोरीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी म्हटलं. दुसरीकडे झिरवळ यांना उमेदवारी घोषित झाल्याने दिंडोरीत बाप विरुद्ध मुलगा अशी लढत होणार असल्याचे म्हटलं जात आहे. यावरुनच नरहरी झिरवळ यांनी मुलगा गोकुळबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
नरहरी झिरवाळ यांचे पुत्र गोकुळ झिरवाळ हे काही दिवसांपूर्वीच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत दिसले होते. त्याआधी ते शरद पवार गटाच्या एका कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना मी शरद पवार यांच्यासोबत आहेत. मी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीतच आहे, माझी छाती फाडली तरी त्यात शरद पवार दिसतील, असे वक्तव्य गोकुळ झिरवाळ यांनी केले होते. त्यामुळे गोकुळ झिरवाळ यांनी वडिलांविरुद्ध बंड थोपटल्याचे म्हटलं जात होतं. मात्र आता नरहरी झिरवाळ यांनी मुलाच्या भूमिकेविषयी भाष्य केलं आहे.
शरद पवार गटाच्या कार्यक्रमात गोकुळ यांच्या उपस्थितीबाबत नरहरी झिरवाळ यांनी स्पष्टीकरण दिलं. "त्याने सत्कार करू का असे विचारले होते मी म्हटलो सत्कार कर आणि निघून ये. हा गेला तर गेला याची आमदार होण्यापर्यंत मजल गेली तर कसं व्हायचं?," असं नरहरी झिरवाळ म्हणाले. "राजकारणात प्रत्येकाला वाटतं मी काहीतरी केलं पाहिजे. त्याचे वय पाहता त्याने अजून खूप काही करणं गरजेचं आहे. मी दिलेल्या भांडवलावर लढण्यापेक्षा त्याने स्वतःच काहीतरी करावं. सगळंच बापाचं वापरून कसं चालणार?, असेही नरहरी झिरवाळ म्हणाले.