नाशिक : मुंबई मराठी साहित्य संघ आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्यातर्फे झालेल्या राज्यस्तरीय नाट्यसंगीत गायन स्पर्धेत नाशिकमधून दोन गायकांची निवड करण्यात आली असून, यात हर्षद गोळेसर आणि अजिंक्य जोशी यांना अंतिम फेरीसाठी प्रवेश मिळाला आहे.मुंबई मराठी साहित्य संघातर्फे नाशिक केंद्राअंतर्गत कुसुमाग्रज स्मारक येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय नाट्यगीत स्पर्धेत एकूण १० स्पर्धकांनी सहभाग घेत नाट्यगीतांचे सादरीकरण केले. यात श्रेया पिसोळकर, पूर्वा क्षीरसागर, प्राची खोत, सेजल काळे, संगीता चव्हाण, आरोह ओक, हर्षद गोळेसर, अजिंक्य जोशी व प्रणाली शंकपाळ यांनी विविध गीतांचे सादरीकरण करीत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धकांना तबल्यावर सुजित काळे तर संवादिनीसह आनंद अत्रे यांनी साथसंगत केली. नाट्यगीत गायक उपलब्ध व्हावेत यासाठी मुंबई मराठी साहित्य संघातर्फे २०१४ पासून ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात येत असून, १२ डिसेंबरला मुंबईत यास्पर्धेची अंतिम फेरी घेण्यात येते. नाशिक केंद्रावर यावर्षी प्रथमच स्पर्धा घेण्यात आली असतानाही स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची प्रतिक्रिया मुंबई साहित्य संघाचे अनंत गोडबोले यांनी व्यक्त केली. यावर्षी नाशिकसह बेळगाव, गोवा, ठाणे या केंद्रावर स्पर्धेची प्राथमिक फेरी घेण्यात येत आहे. नाशिक केंद्रावर नाट्यलेखक, दिग्दर्शक मनोहर सोमण व तबलावादक नितीन पवार यांनी परीक्षकांची भूमिका पार पाडली.
नाट्यसंगीत गायन स्पर्धेत गोळेसर, जोशी अंतिम फेरीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 1:52 AM