याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी १२ वाजण्याच्या सुमारास संताई बंगला येथे राहणाऱ्या पार्वताबाई विष्णू हिंगमिरे या महिला त्यांच्या घराजवळ असलेल्या किराणा दुकानातून
किराणा माल घेऊन घरी पायी जात होत्या. यावेळी एका काळ्या रंगाच्या दुचाकीने भरधाव आलेल्या दोघांनी त्यांच्याजवळ येऊन गाडीचा वेग कमी करीत पाठीमागे बसलेल्या चोरट्यांनी गळ्याला हिसका देत सोनसाखळी खेचत धूम ठाेकली. दरम्यान, हिंगमिरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अंबड पोलीस ठाणे हद्दीच्या पाठोेपाठ म्हसरुळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा सोनसाखळी चोरीच्या घटना एकामागे एक घडत असल्याने महिलांमध्ये भीतीचे तीव्र वातावरण पसरत आहे. या आठवड्यात म्हसरूळ पोलिसांच्या हद्दीत पेठरोडला एका शिक्षिकेच्या गळ्यातून सोनसाखळी ओरबाडून नेल्याची घटना घडली होती. या घटनेचा तपास पोलीस सुरु करीत नाहीत तोच पुन्हा ही दुसरी घटना घडल्याने सोनसाखळी चोरांनी शहरातील पोलिसांना खुले आव्हान दिले की काय? अशी चर्चा होत आहे. सोनसाखळी चोर दिवसाढवळ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून पसार होत असताना दुसरीकडे मात्र पोलिसांना या चोरांचा कुठलाही थांगपत्ता लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.