या सोनसाखळी चोरीप्रकरणी तांबोळीनगर साई रेसिडेन्सी येथे राहणाऱ्या शोभा जयराम रणधीर यांनी तक्रार दाखल केली आहे. रणधीर या गुरुवारी कामानिमित्त गावात गेल्या होत्या. दुपारी साडेचार वाजता त्या हिरावाडीत रिक्षा स्टँड येथे रिक्षातून उतरून तांबोळी नगरकडे घराकडे पायी चालत जात असताना जोशी कॉलनी कमानीजवळ काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या भामट्यांनी त्यांच्याजवळ येत त्यांच्या गळ्यातील चार तोळे वजनाची सोनसाखळी जबरीने ओरबाडून गुंजाळनगरकडे पलायन केले. हिरावाडीरोड तसेच हिरावाडीत यापूर्वी पाच ते सहावेळा सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. मात्र,तरीही पोलिसांना सोनसाखळी चोर मिळत नसल्याने पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
इन्फो====
सोनसाखळी चोर सुसाट
शहरात काही दिवसांपासून सोनसाखळी चोरट्यांनी डोके वर काढून सोनसाखळी चोरीचा धडाका लावला असला तरी स्थानिक पोलीस ठाण्यातील गुन्हा शोध पथकातील कर्मचारी किंवा शहरात विभागनिहाय गुन्हे शोधपथकाला सोनसाखळी चोरांचा सुगावा लागत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांनी उपाययोजना करणे गरजेचे आहे.