-----------
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : पोलीस आयुक्तालय हद्दीत मंगळवारी रात्री आठ वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत ‘मिशन ऑल आऊट’ राबविण्यात आले. यावेळी ३६ ठिकाणी नाकाबंदीचे आदेश देण्यात आल्याने रस्त्यांवर पोलीस फौजफाटा दिसत होता तरीदेखील सोनसाखळी चोरांनी काठे गल्ली व उपनगर भागात केवळ दोन तासांच्या अंतराने दोन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावून पलायन केल्याची घटना घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर पोलीस रस्त्यांवर उतरून प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना दुसरीकडे चोरट्यांकडून पोलीस प्रशासनाला खुले आव्हान देत पोलिसांच्या नाकावर टिच्चून महिलांच्या गळ्यांमधील सोनसाखळ्यांना हिसका दिला जात आहे. शहर व परिसरात सातत्याने महिलांच्या सोनसाखळ्या दुचाकीने आलेल्या चोरट्यांकडून लंपास केल्या जात आहे.
शहरात पोलिसांकडून नाकाबंदी केलेली असतानाही डीजीपीनगर येथील एका दुकानासमोर सायंकाळच्या सुमारास पादचारी महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्याने ओरबाडून नेली. ज्योती तुषार घोडके (रा. नाशिक रोड) या मंगळवारी सायंकाळी घराकडे पायी जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरील चोरट्याने त्यांच्या गळ्यातील २० हजार रुपयांची ७ ग्रॅम वजनाची सोन्याची पोत ओरबाडून नेली. ही घटना रात्री ८ ते सव्वाआठच्या दरम्यान घडली. यावेळी पोलिसांकडून रात्रीच्या संचारबंदीची अंमलबजावणी केली जात होती. घोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील शंकर नगर चौफुलीजवळ साडेसात वाजण्याच्या सुमारास एका पादचारी महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅम वजनाची सोनसाखळी दुचाकीने आलेल्या चोरट्यानी ओरबाडून पलायन केले.
याप्रकरणी काठेगल्लीतील आयटीआय कॉलनीतील रहिवासी स्वाती नीलेश पाटील (४०) यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील मंगळवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्या होत्या. शंकर नगर येथील चौफुलीजवळील लक्ष्मी अपार्टमेंटसमोरून त्या जात असताना काळ्या रंगाच्या दुचाकीने त्यांच्याविरूध्द दिशेने आलेल्या चोरट्यांनी सुमारे ७० हजार रूपये किमतीचे मंगळसूत्र ओरबाडून पळ काढला.
--------इन्फो-----
युवकांनी दिले होते सोनसाखळी चोर पकडून
आठवडाभरापूर्वी नाशिक रोड पोलीस ठाणे हद्दीत चेहेडी गावाजवळ महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढणाऱ्या दोघात चोरट्यांना जागरूक युवकांनी पाठलाग करून ताब्यात घेत पोलिसांच्या हवाली केले होते. या दोघा चोरट्यांचे साथीदार मात्र महिलेची सोनसाखळी हिसकावून संगमनेरच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी ठरले होते. या चोरट्यांचा अद्यापही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही नागरिकांनी त्यांचे दोन साथीदार पकडून पोलिसांच्या हवाली केले असले, तरीदेखील जे चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले, त्यांचा माग काढण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही.