नाशिकरोड : आर्टिलरी सेंटररोड, जैन भवनजवळ वर्धमान सोसायटीतील बंद प्लॅटच्या पाठीमागील दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने ४० तोळ्याचे सोन्याचे दागिने व साडेचार लाखांची रोकड असा जवळपास साडेदहा लाखांचा ऐवज चोरून नेला. भरवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये कमालीचे असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जैन भवनजवळील वर्धमान सोसायटीत नामको बँकेचे संचालक संतोष मांगीलाल धाडीवाल हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. धाडीवाल यांच्या भाच्याचे लग्न असल्याने संपूर्ण कुटुंब गेल्या शुक्रवारी घराला कडीकुलूप लावून पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे लग्नास गेले होते. आजूबाजूचे रहिवासी बंद प्लॅटकडे लक्ष देऊन होते. मात्र, मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी मागील बाजूचा किचनच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच आतील बंद खोल्यांच्या दरवाजाचे कडीकोयंडे तोडून चोरट्यांनी चार लाख ३८ हजारांची रोकड, सोन्याची चेन, कानातील डायमंड रिंग, बांगड्या, अंगठ्या, नथ, कडे, कानातील झुमके, पोत, सोन्याचे टॉप, पेंडल सेट, सोन्याचे घड्याळ, मंगळसूत्र, सोन्याच्या खड्यांचा हार, सात तोळे चांदीचे शिक्के, प्लॅटिनियमची अंगठी असे ४०तोळ्याचे दागिने असा एकूण दहा लाख ३१ हजारांचा ऐवज चोरून नेला.
बुधवारी सकाळी धाडीवाल यांच्या शेजारील वयोवृद्ध कोठारी यांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत राजेंद्र बोथरा यांना माहिती दिली. रहिवाशांनी तत्काळ उपनगर पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक निलेश माईनकर व पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. ठसे तज्ज्ञांनीही पाहणी केली. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात पुष्पक संतोष धाडीवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भरलोकवस्तीत झालेल्या या घरफोडीमुळे रहिवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना व्यक्त होत आहे.
टवाळखोर व मद्यपींचे अड्डे
लिंगायत कॉलनीतील मनपाचे बंद पडलेले समाजमंदिर, आर्टिलरी सेंटर जैन मंदिरासमोरील मनपा क्रीडांगण, क्रीडांगणाच्या व्यापारी संकुलाचा शौचालय परिसर, समोरील युको बँकेमागील मोकळी जागा हे टवाळखोर व मद्यपींचे हक्काचे अड्डे झाले आहेत. या ठिकाणी मद्यपींसोबत गांजा, अफीम, व्हाईटनर यांची नशा करणारे नशेडी रात्री उशिरापर्यंत वावरत असतात. रहिवाशांनी वारंवार तक्रारी करूनही पोलीस कारवाई करत नाहीत. पोलीस कारवाईला येताना लांबून सायरन वाजवत येत असल्याने टवाळखोर व मद्यपी पळून जातात.
चोरट्यांनी उस्तरलेले कपाट.