नाशिकरोड : देवळालीगाव पाटील गॅरेजमागील रेवगडे चाळ येथे एका अनोळखी इसमाने ‘तुमच्या मुलीचे घरकुल मंजूर झाले असून, त्याचा चेक आला आहे. तो घेण्यासाठी तारण म्हणून किमती वस्तू किंवा पैसे द्यावे लागतील असे सांगून चाळीस हजारांची सोन्याची पॅन्डल असलेली पोत घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.रेवगडे चाळीतील विमलकौर लखासिंग पलोडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शुक्र वारी दुपारी साडेतीनला एक अनोळखी इसम आला. तो म्हणाला की, मुलगी सविता पलोडे यांच्या घरकुल योजनेचा चेक आला असून, घर मंजूर झाले आहे. चेकसाठी तुम्हाला दोन लाख रु पये किंवा किमती वस्तू तारण द्यावी लागेल. वस्तू दिली नाही तर चेक परत जाईल. विमल कौर यांनी चाळीस हजारांची सोन्याची पोत या इसमाकडे दिली. कौर यांनी त्याच्यासोबत शेजारील दोन अल्पवयीन मुलांना पाठविले. त्या इसमाने मुलांना गाडीवर बसवून पुढे उतरवले. तुम्ही जा मी चेक घेऊन येतो असे सांगून पोत घेऊन पोबारा केला. नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.