नाशिक : रस्त्याने पायी जाणा-या वृध्द महिलेस सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून भामट्यांनी तीस हजार रूपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र लांबविल्याची घटना मेळा बसस्थानक परिसरात घडली. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मीराबाई बाळू बोडके ( रा.तळवडे ता.त्र्यंबकेश्वर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. मीराबाई बोडके या शुक्रवारी कामानिमित्त शहरात आल्या होत्या. काम आटोपून सायंकाळी घराकडे परतण्यासाठी मेळा बसस्थानकात त्या आल्या असता ही घटना घडली. जुन्या सीबीएस परिसरातून त्या मेळा बसस्थानकात रस्त्याने पायी जात असतांना त्यांना गुलाबी व हिरवा शर्ट परिधान केलेल्या दोघा भामट्यांनी गाठले. यावेळी भामट्यांनी सोन्याचे बनावट बिस्कीट दाखवून त्यांनी वृध्देकडे खरेदी करण्यासाठी गळ घातली. बोडके यांनी त्यांना पैसे नसल्याचे सांगताच संशयीतांनी आजी पैसे नसतील तर मंगळसुत्र दिल्यास आम्ही बिस्कीट देवू असे सांगून बिस्कीट हातावर ठेवले. त्यामुळे वृध्देनी आपल्या गळ््यातील सुमारे ३० हजार रूपये किमतीचे मंगळसुत्र भामट्यांच्या स्वाधीन केले. घरी गेल्यानंतर सोन्याच्या बिस्कीटची तपासणी केली असता ते बनावट असल्याचे लक्षात येताच बोडके यांनी पोलिसात धाव घेतली असून अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.