नाशिकरोड : शिखरेवाडी मैदानावरून मॉर्निंग वॉक करून घरी येणाऱ्या वयोवृद्ध इसमास गंधर्वनगरी येथे दुचाकीवर आलेल्या दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून सव्वा लाखाचे सोन्याचे दागिने चोरून नेले. मोटवानीरोड श्रीराम नगर हौसिंग सोसायटीत राहाणारे भिकनआप्पा वसंतआप्पा फत्तरफोडे (वय ६९) हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास शिखरेवाडी येथील मैदानावर मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. मॉर्निंग वॉक झाल्यानंतर साडेनऊच्या सुमारास फत्तरफोडे रस्त्याने पुन्हा पायीपायी घरी येत असताना गंधर्वनगरी हनुमान मंदिराजवळ पल्सर दुचाकीवर आलेल्या दोघा अज्ञात इसमांनी आम्ही पोलीस आहोत असे सांगून त्यांनी ओळखपत्र दाखविले. पुढे चोरी झाली असून, आम्ही चेकिंग करत आहोत. अंगावरील सोन्याचे दागिने काढुन ठेवा, असे सांगितले. फत्तरफोडे यांनी गळ्यातील सोन्याची साखळी, गळ्यातील व हातातील सोन्यात गुंफलेली रुद्राक्षाची माळ, दोन सोन्याच्या अंगठ्या, चांदीचे पदक असे सहा तोळे वजनाचे दागिने अंगावरून उतरवून रूमालात बांधून खिशात ठेवत असताना त्या दोघा भामट्यांनी नजर चुकवून सुमारे सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. भर लोकवस्तीत झालेल्या या प्रकारामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
गंधर्र्वनगरीत वृद्धाचे सोन्याचे दागिने लुटले
By admin | Published: September 30, 2015 12:21 AM