वडझिरे/नायगाव : सिन्नर तालुक्यातील सोनगिरी येथील शेतकरी शिवाजी भिकाजी बोडके (४२) यांनी कर्जबाजारी पणाला कंटाळून सोमवारी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्त्या केली. पंधरा दिवसांवर मुलीचे लग्न येऊन ठेपले असताना पित्याने आत्महत्त्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शिवाजी यांचे वडील भिकाजी बोडके यांच्या नावावर नायगाव येथील गोदा युनियन कृषक संस्थेचे सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज आहे. भिकाजी बोडके यांचे निधन झाले आहे. शेतमालाला बाजारभाव नसल्यामुळे बोडके यांचे कर्ज थकले होते. काही दिवसांपूर्वीच सदर कर्जाबाबत बँकेकडून बोडके यांना नोटीस पाठविण्यात आली होती. यात शिवाजी यांच्या मोठ्या मुलीचा विवाह जमल्याने ५ एप्रिल २०१७ ही लग्नाची तारीख ठरविण्यात आली. मुलीचे लग्न आणि थकलेले कर्ज अशा दुहेरी आर्थिक विवंचनेत ते होते. सोमवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास शिवाजी यांनी टोकाचा निर्णय घेत विषारी औषध सेवन केले. सदर बाब कुटुंबीयांच्या लक्षात येताच त्यांना नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा सोनगिरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. (वार्ताहर)
सोनगिरीच्या शेतकऱ्याची आत्महत्त्या
By admin | Published: March 22, 2017 12:04 AM