लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : आषाढ अमावास्या अर्थात गटारी अमावास्येला मद्यप्राशन करून वाहन चालविणे मद्यपींना चांगलेच महागात पडले़ पोलीस ठाणे तसेच शहर वाहतूक शाखेने ब्रेथ अॅनालायझरच्या साहाय्याने मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ३५ तळीरामांवर केलेल्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्हअंतर्गत कारवाई करण्यात आली़आषाढ अमावास्या ही रविवारी आल्याने तसेच सोमवारपासून श्रावणमासास प्रारंभ होत असल्याने मांसाहार व मद्यपान करणाऱ्यांनी अनेक हॉटेल्स तसेच मद्यविक्री दुकानांबाहेर गर्दी केली होती़ त्यामुळे रविवारी दिवसभर शहर तसेच पर्यटनस्थळांवरील हॉटेल तसेच बिअरबारमध्ये तळीरामांची मोठी गर्दी होती़ कायदा व सुव्यवस्था तसेच अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस तसेच स्थानिक पोलिसांनी कॉलेजरोड, दिंडोरीरोड, मुंबई-आग्रा रोड, औरंगाबादरोड, गंगापूररोड, पुणेरोड अशा सर्वच ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते़ पोलीस दुचाकी तसेच चारचाकी वाहनचालकांची ठिकठिकाणी ब्रेथ अॅनालायझरने तपासणी करीत होते़ दरम्यान, पोलिसांची ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याने कारवाई करण्यात आलेल्या तळीरामांच्या संख्येत भरच पडण्याची शक्यता आहे़
तळीरामांना गटारी अमावास्या पडली महागात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 10:37 PM