नाशिक : गोल्फ क्लबच्या नूतनीकरणाचे रखडलेले काम येत्या एप्रिलपर्यंत पूर्ण होणार असून, तसे लेखी आश्वासन महापालिकेच्या वतीने कॉँग्रेस नगरसेविका डॉ. हेमलता पाटील यांना देण्यात आले आहे.गोल्फ क्लब येथील जॉगिंग ट्रॅक परिसरात नूतनीकरण आणि सुशोभिकरणाचे काम सध्या करण्यात येत आहे. मात्र सध्या हे थांबले असून, ते कधी सुरू होणार याबाबत कोणालाही माहिती नाही. शासनाकडून शहरात मेकॅनिकल पार्किंगसाठी आलेला निधी या कामासाठी वळविण्यात आला असून, महापालिकेचाही निधी त्यात असल्याने सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून हे काम केले जात आहे. तथापि, काम सुरू झाल्यानंतर ते अत्यंत संथगतीने सुरू आहे. दररोज या ट्रॅकवर सुमारे पंधरा हजार नागरिक सकाळ सायंकाळ जॉगिंगसाठी येत असतात. त्यांची गैरसोय होत असून, त्यांना अन्य जॉगिंग ट्रॅकवर जावे लागत आहे. प्रभागाच्या नगरसेविका म्हणूनदेखील पुरेशी माहिती मिळत नसल्याने डॉ. हेमलता पाटील यांनी बुधवारी (दि.१३) गोल्फ क्लब येथेच धरणे आंदोलन केले होते.महापालिकेचे आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी आंदोलनाच्या दरम्यान डॉ. हेमलता पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली आणि शहर अभियंता घुगे यांना पाठवून सविस्तर माहिती सादर करतो असे सांगितले. मात्र घुगे सायंकाळी गेलेच नाही. त्यामुळे डॉ. पाटील यांनी आता यासंदर्भात महासभेतच जाब विचारण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर गुरुवारी (दि.१४) घाईघाईने घुगे यांनी डॉ. पाटील यांना माहिती दिली असून, दोन दिवसांत ते काम पुन्हा सुरू होईल. त्याचप्रमाणे एप्रिलपर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती लिखित स्वरूपात दिली आहे.
गोल्फ क्लबचे रखडललेले नूतनीकरण एप्रिलपर्यंत पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 1:09 AM