नाशिक : समर्थ रामदास स्वामी यांनी आगर टाकळी येथे स्थापन केलेल्या गोमय मारुती मंदिराचे पावित्र्य आजही कायम असून, मूळ ढाच्याला कोणताही हात न लावता जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे. जिर्णोद्धाराचे काम पूर्णत्वाकडे जात असून, मंदिराला या ठिकाणी श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले असून, सुमारे पावणे चारशे वर्षांपूर्वीच्या या मंदिरात भक्ताचा दर्शनासाठी अखंड ओघ सुरूच आहे. दरम्यान, भक्तांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या सोडण्याची मागणी होत आहे. श्री क्षेत्र नाशिकनजिक नंदिनी गोदावरीच्या संगमावर असलेल्या आगर टाकळी येथे इ.स. १६२0 मध्ये समर्थ रामदास स्वामी यांनी १२ वर्षे तपश्चर्या केली तसेच १३ कोटी रामनामाचा जप केलेल्या मारुतीराय त्यांना प्रसन्न झाले. त्यानंतर १६३३ मध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेस हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी समर्थ रामदासांनी गोमय म्हणजे शेणाच्या मारुतीच्या मूर्तीची स्थापना केली. पहिले मठाधिपती हणून उद्धवस्वामी यांची नियुक्ती केली होती. तेव्हापासून आजतागायत या गोमय मारुतीचे पावित्र्य जसेच्या तसे जपून ठेवण्यात आले आहे. देवस्थानच्या देखभालीसाठी इ.स. १७५३ मध्ये नानासाहेब पेशव्यांनी तत्कालीन मठाधिपती भीमा स्वामी यांना टाकळी गावासह २00 एकर जमिनीची सनद देवस्थानाला अर्पण केली होती. सध्या गोमय मारुती मंदिराचा कारभार श्री मारुती देवस्थान आणि राष्ट्रसंत समर्थ रामदास स्वामी मठ या ट्रस्टद्वारे पाहण्यात येत आहे. ट्रस्टच्या वतीने रथसप्तमी, दासनवमी, श्रीरामनवमी आणि श्री हनुमान जन्मोत्सव हे उत्सव साजरे करण्यात येतात. सध्या हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भाविक येत असल्याने त्यांच्या सोयीसाठी जादा बसगाड्या तसेच शहर बसची व्यवस्था करावी तसेच येथे येणारी नाशिक दर्शन बस पूर्ववत सुरू करावी, अशी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी सुधीर शिरवाडकर, अॅड. दिलीप कैचे, ज्योतीराव खैरनार, अॅड. प्रकाश पवार आदिंनी केली आहे.
आगर टाकळीच्या गोमय मारुती मंदिरात भक्तांचा अखंड ओघ
By admin | Published: April 11, 2017 1:44 AM