नाशिक : सिन्नर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पुणे महामार्गावरील ठाणगाव वनपरिमंडळातील दापूरजवळील गोंदेफाट्यावरुन भरधाव जाणा-या एका अज्ञात चारचाकी वाहनाने रस्ता ओलांडणाºया बिबट्यास धडक दिल्याने एका प्रौढ मादीचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.याबाबत वनविभागाकडून मिळालेली माहिती अशी, शनिवारी (दि.५) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास वनक्षेत्रपाल प्रवीण सोनवणे यांना स्थानिक गावकऱ्यांनी बिबट्या रस्त्यालगत मृतावस्थेत पडल्याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सोनवणे यांनी आपल्या पथकासह गोंदेफाटा गाठला. रस्त्यावर अंदाजे दोन ते तीन वर्षे वयाची बिबट्या मादी वाहनाच्या धडकेत गतप्राण झाल्याचे आढळले. वनअधिका-यांनी घटनास्थळी पंचनामा करत बिबट्याचा मृतदेह वाहनातून सिन्नर वनोद्यानात हलविला. रविवारी (दि.६) मृतदेहाचे शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. अज्ञात वाहनाचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. घटनास्थळाच्या परिसरात प्रत्यक्षदर्शी कोणी आहे, का याबाबतही तपास केला जात आहे.--
गोंदे फाटा : वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 06, 2020 4:30 PM