नाशिक : उमेदवारांचे प्रचार आता सर्व मार्गांनी मतदारांच्या कानी पडत आहेत. त्यातही मुख्य रस्ते, गल्ल्या आणि चौकाचौकात उभे राहून आणि फिरणाऱ्या प्रचारवाहनांवरून जी प्रचारगीते चालवली जात आहेत, त्या गीतांनी नागरिकांचे पुरेपूर मनोरंजन होत असून, तरुणाईकडून तर या गीतांची यथेच्छ फिरकी घेतली जात असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.नाशिकच्या विविध मतदारसंघांत उमेदवारांचा प्रचार जोर पकडत आहे. त्यात प्रामुख्याने प्रचारगीतांचा बोलबाला अधिक आहे. कुणी ‘आले आले ...’ म्हणत आपल्या उमेदवाराचा प्रचार करीत असताना मग कट्ट्यांवर बसणारी तरुणाई ‘आता आले, मग आधी कुठे गेले होते ?’ असा सवाल करताना दिसत असल्यास नवल नाही.काही उमेदवारांनी ‘सर्वांचे लाडके’ म्हणत केलेल्या प्रचारालादेखील लाडके आहेत, ना मग निवडून तर येतीलच ही गाणीबजावणी कशाला, असे म्हणत यथेच्छ फिरकी घेतली जात आहे. सर्वांच्या मनातले ‘लोकप्रिय उमेदवार’ असा प्रचार एका मतदारसंघात केला जात असल्याने त्या भागातील तरुणाई ते जर का लोकप्रिय आहेत, तर निवडून येतीलच ना असे म्हणत प्रचार यंत्रणेची टर उडवतात. एके ठिकाणी ‘तरुण तडफदार, नवी दिशा देणारे उमेदवार’ असे आवाहन करीत वाहने फिरू लागल्यावर हीच तरुणाई अरे भाऊ तो तरुण असेल तर आमचं मत त्यांनाच आहे, मग आता गाणी थांबव, असेही तरुणाई सांगते.एवढी कामे म्हणजे केवढी भाऊ... एक उमेदवार त्याच्या प्रचारात मतदारसंघात ही कामे झाली, ती कामे झाली अशी कॅसेट प्रचारगीतांमध्ये वाजवत आहे. यावरून कट्टा गॅँगवरील तरुणाईला अधिकच चेव चढलेला दिसून आला. त्यांच्याकडून मग एवढी कामे जर खरोखरच पूर्ण झाली असती तर त्यांना प्रचारालाच फिरायची गरज नसती, असे म्हणत उमेदवारांच्या प्रचारयंत्रणेतील त्रुटींना लक्ष्य करण्यात येवून फिरकी घेतली जात आहे.एका मतदारसंघात ‘आपला माणूस’ नावाने उमेदवाराचा प्रचार केला जात असल्याने जर तो आपला प्रत्येकाचा आहे, तर मग त्याच्या प्रचाराची गरजच नाही. सर्वजण आपल्या माणसालाच मतदान करणार असे म्हणत त्या उमेदवाराची खेचाखेची करताना दिसत आहेत.४एका मतदारसंघात ‘ताई आपल्या हक्काची...’ अशी धुन ऐकायला येत आहे. त्यावरून या ताई जर हक्काच्या आहेत, तर त्यांनाही प्रचार करायची गरजच नव्हती, असे शालजोडीतले आहेर देण्यासदेखील कट्टा ग्रुपमध्ये चढाओढ लागलेली आहे.
आले आले, मग आतापर्यंत कुठे होते गेले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 1:44 AM
उमेदवारांचे प्रचार आता सर्व मार्गांनी मतदारांच्या कानी पडत आहेत. त्यातही मुख्य रस्ते, गल्ल्या आणि चौकाचौकात उभे राहून आणि फिरणाऱ्या प्रचारवाहनांवरून जी प्रचारगीते चालवली जात आहेत, त्या गीतांनी नागरिकांचे पुरेपूर मनोरंजन होत असून, तरुणाईकडून तर या गीतांची यथेच्छ फिरकी घेतली जात असल्याचे चित्र सध्या सर्वत्र दिसून येत आहे.
ठळक मुद्देप्रचार गीतांची अशीही फिरकी : उमेदवारांच्या प्रचाराची तरुणाईकडून खिल्ली