चांदोरी : कोरोनामुळे व अवकाळी गतवर्षापासून फुल उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला मात्र नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना आता राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यात आल्याने सद्य:स्थितीत नवरात्रोत्सवामुळेही फुलांची मागणी वाढल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.दसरा आणि दिवाळी या सणासुदीच्या कालावधीत फुलांच्या मागणीसोबतच दरवाढीचीही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. गतवर्षी टाळेबंदीचा सर्वाधिक फटका फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसला. त्यात यंदाही गणेशोत्सव साधेपणानेच पार पडला. त्यामुळे फुलांना अपेक्षीत मागणी आली नाही. तथापि राज्यातील मंदिर व धार्मिक स्थळे बंद असल्याचाही फटका शेतकऱ्यांना सोसावा लागला दरम्यान, घटस्थापनेला राज्यातील धार्मिक स्थळे खुली झाल्यानंतर आता फुलांची मागणी वाढली आहे.नवरात्रोत्सव घरोघरी साजरा होत असल्याने फुलांची मागणी वाढली आहे. मागील वर्षी झालेले नुकसान पाहता यंदा फुलशेतीचे क्षेत्र घटले आहे. अशा स्थितीतही निफाड तालुक्यात काही शेतकऱ्यांनी केवळ दसरा, दिवाळीसाठी धाडसाने फूलशेती केली आहे. विपरीत परिस्थितीतही आता फुलशेती चांगलीच बहरलेली आहे. त्यात मंदिरे खुली झाल्याने मागणी वाढत आहे. त्यातच दसरा दिवाळी हे महत्त्वाचे सण अगदी तोंडावर आले असल्याने फुलांना मोठी मागणी राहणार असल्याने फुलोत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.अवकाळी पावसाने नुकसानमागील महिन्यात झालेल्या परतीच्या पावसाने झेंडू शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते मात्र काही भागात झेंडू चांगलाच बहरला आहे. शेतकऱ्यांना दसरा व दिवाळीला झेंडूला चांगला दर मिळेल अशी आशा आहे.मागील वर्षी प्रथमतः झेंडूचे उत्पादन घेतले होते. मात्र टाळेबंदी व देवस्थान बंद असल्याने फुलांची विक्री करणे मुश्किल झाले होते. मात्र या वर्षी पुन्हा मंदिर व देवस्थाने खुली झाल्याने झेंडू व इतर फुलांना चांगला भाव मिळेल, अशी आशा आहे.- हृषीकेश खालकर, फूल उत्पादक. (१२ चांदोरी ३,४)
मंदिरे खुली झाल्याने फुल उत्पादकांना अच्छे दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 11:25 PM