जळगाव निंबायती : (अमोल अहिरे )जगभरात आलेल्या कोरोनाच्या महाभयंकर संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यासह देशभरात तब्बल अडीच महिन्यांहून अधिक काळ ताळेबंद लागल्याने जवळपास सर्वच व्यवसायांवर याचा परिणाम झाला.लग्नसराईलादेखील कोरोनाचा फटका बसला. छोटेखानी लग्न समारंभ करण्याचे शासनाचे आदेश असल्याने ऐन लग्नसराईच्या हंगामात लॉन्स, मंगल कार्यालय संचालक, वाजंत्री, घोडेवाले, आचारी, वाढपी, पुरोहित आदी यासंबंधी व्यावसायिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. मात्र सध्या होत असलेल्या छोटेखानी लग्नसोहळ्यासाठी कमी खर्चीक पारंपरिक संबळ वाजंत्रीला लोकांची विशेष पसंती मिळत आहे. यामुळे संबळ वादकांना सध्या तरी ‘अच्छे दिन’ आले आहेत. अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात प्रशासनाने जाहीर केलेल्या नवीन नियमावलीप्रमाणे लग्न सोहळ्यासाठी दोन्ही बाजूंकडील जेमतेम पन्नास सगेसोयरे वºहाडी मंडळींना उपस्थित राहण्याची परवानगी आहे. शिवाय शारीरिक अंतराचा नियम पाळून आणि उपस्थितांनी चेहऱ्यावर मास्क लावून अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळ्याचा प्रवास सध्या सुरू झालेला आहे. अशा पार्श्वभूमीवर लग्नात वरातीसाठी केवळ चार वादकांचे पथक असलेल्या पारंपरिक संबळ वाजंत्रीला सुगीचे दिवस आले आहेत. या वाजंत्री व्यवसायावर पोटापाण्यासाठी अवलंबून असणाºया वादकांना नाइलाजाने अन्य व्यवसाय, शेती, मजुरी किंवा अगदी मिळेल ते काम करण्याची वेळ आली होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोटेखानी लग्नसोहळ्यासाठी केवळ चार वादक असलेल्या संबळ वाजंत्रीला लोकांची मागणी वाढत आहे.--------------------काही वर्षापूर्वी लग्नसोहळा म्हटले की सनई-चौघडे, संबळ वाजंत्री या पारंपारिक साधनांनाच विशेष पसंती मिळत असे. लग्न म्हटले की, वाजंत्रीशिवाय शोभा नाही, असा काहीसा समज आहे.लग्नसराईच्या काळातील केलेली कमाई या वादकांना वर्षभर पुरत असे. मात्र गेल्या काही वर्षांपासून लग्नाचा थाट बदलला. लग्नात वºहाडी मंडळींची संख्या लक्षणीय वाढू लागली.लग्नाच्या वरातीसाठी आलेल्या आधुनिक बॅण्ड, बेंजो, डीजेच्या दणदणाटात ही पारंपरिक वाद्य आणि वाजंत्री प्रकार काळाच्या ओघात लोप पावल्यासारखी स्थिती निर्माण झाली होती.--------------------संबळ वाजंत्रीचा आमचा पारंपरिक व्यवसाय असून, गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी आमचा परिवार या व्यवसायात आहे. संबळवादक, सूर व दोन पिपाणीवादक असे चार वादकांचे पथक असून, एका लग्नाची सुपारी सहा ते सात हजार रुपये असते. बॅण्ड व डिजेच्या तुलनेत संबळ कमी खर्चीक वाजंत्री आहे. यामुळे लोकांची मागणी वाढत आहे. या कलेची जोपासना होण्याच्या उद्देशाने आम्ही आमच्या मुलांनादेखील ही वाद्ये शिकविण्याचा प्रयत्न करीत आहोत.- दिनकर अहिरेसंबळवादक, चोंडी जळगाव
लॉकडाऊनच्या काळात संबळ वाजंत्रीला ‘अच्छे दिन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 9:00 PM