लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या अज्ञानपणाचा फायदा घेत नामांकित कंपन्यांच्या नावांची हुबेहूब नक्कल करून बनावट औषधांची निर्मिती व विक्री करणारे मोठे रॅकेट राज्यात कार्यरत असून, त्यांना शोध घेऊन त्यांचे दुकान, गुदामावर छापा मारण्याची कठीण कारवाई कृषी विभाग करीत असला तरी, त्या संदर्भात दाखल होणा-या गुन्ह्याच्या तपासात पोलीस यंत्रणा अपुरी पडत असल्याचे आजवरच्या गुन्ह्यांच्या उलगड्यावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या आठ महिन्यांत विभागीय कृषी कार्यालयाने दीड डझनापेक्षा अधिक विक्रेत्यांवर कारवाई केली असली त्यातून पोलिसांना फारसे काही निष्पन्न करता आलेले नाही.
नाशिक येथे नोव्हेंबर महिन्यात कृषी विभागाने कॅनडा कॉर्नर येथील परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन या कंपनीवर छापा मारून लाखो रुपयांची बनावट औषधे व प्रतिबंधक रासायनिक द्रव्ये जप्त केली होती. विशेषत: द्राक्ष मण्यांच्या वाढीसाठी व वजन भरण्यासाठी महत्त्वाच्या असणा-या सीपीपीयू सारख्या महागड्या औषधांची नक्कल करण्याचा प्रकार यामुळे उघडकीस आला होता. दुकानमालक राजेंद्र मोदी व त्याचा सहकारी भानुशाली या दोघांच्या विरोधात कृषी विभागाने सरकारवाडा पोलिसांत तक्रार दिली असली तरी, तपासात पोलीस फार प्रगती करू शकलेले नाही. संबंधित दुकानमालक मोदी याने सदरची औषधे कोठून आणली, कोणाकोणाला विक्री केली याची माहिती पोलीस काढू शकलेले नाही. त्यामुळे या गुन्ह्यावर फारसा प्रकाशझोत पडू शकला नसल्याने बनावट औषध विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे. राज्यात अशा प्रकारची बोगस औषधांची विक्री करणारी टोळी कार्यरत असण्याची शक्यता कृषी विभाग व शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. एकट्या नाशिक जिल्ह्यात आठ महिन्यांत सहा गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यात वेदांत अॅग्रो, नोबल अॅग्रो, सुशांत बाहेती केमिकल्स, परफेक्ट इन्स्ट्रूमेंट कार्पोरेशन, भूमी अॅग्रो, महाफिड आदी कंपन्यांचा समावेश आहे. नाशिकबरोबरच विभागातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यातील बनावट औषध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु मिळालेल्या माहितीनुसार या गुन्ह्यातील संशयित आरोपींकडून गुन्ह्यावर प्रकाशझोत टाकू शकणारी माहिती पोलीस काढू शकलेले नाहीत. त्यामुळे एका ठिकाणावर छापे पडले की जागा बदलून नवीन दुकान थाटण्याचा प्रकार घडू लागले असून, त्यातून शेतकऱ्यांची फसवणूक अटळ झाली आहे. पोलीस यंत्रणेने अजूनही या साºया प्रकरणांना गांभीर्याने घेतल्यास मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.