नाशिक : दिवाळी उत्सवाला मांगल्याच्या आणि भरभराटीच्या शुभेच्छा देण्याची रीत आहे. हाच शुभेच्छांचा वर्षाव अन् दिवाळीचा रंग सोशल नेटवर्किंग साइट्सवरही अनुभवायला मिळत आहे. नेटिझन्सकडून नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यात येत आहेत. कोणी व्हिडीओतून तर कोणी संदेशाच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. यंदा ‘ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मेट’ या फेसबुक आणि व्हॉट्स अॅपवरील नव्या सुविधांमुळे दिवाळीच्या शुभेच्छा खास दहा ते वीस सेकंदाच्या व्हिडीओमधून व्यक्त केल्या जात आहेत. सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून कुटुंबीय, नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींना शुभेच्छा देण्यासाठी संदेश पाठवून दिवाळी आनंदाची आणि भरभराटीची जावो, ही कामना करण्यात येत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सोशल नेटवर्किंगच्या जगात नवे पर्याय आणि नवे फंक्शन उपलब्ध झाले आहेत. त्याचा वापर करून तरु णाई दिवाळीचा उत्साह व्यक्त करीत आहे. त्यात फेसबुक, व्हॉट्स अॅप, इंस्टाग्रॅम, हाईक यांसारख्या साईट्सच्या माध्यमातून पाठविल्या जाणाऱ्या छोट्या व्हिडीओमुळे दिवाळी काहीशी खास बनली आहे. याच दहा ते वीस मिनिटांच्या व्हिडीओत दिवाळीचे महत्त्व, फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी पहायला मिळत आहे. सोशल नेटवर्किंग साइट्सवर घरच्या दिवाळीचे प्रत्येक क्षण न् क्षण शेअर केले जात आहेत. दिवाळीनिमित्त गावी गेलेले तरु ण-तरु णी ‘गावच्या दिवाळी’चे छायाचित्र आणि आठवणी शेअर करत आहेत, तर काहीजण दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचे वैशिष्ट्य, त्यांनी केलेला पेहराव आणि कुटुंबीयांसोबत घालविलेल्या प्रत्येक क्षणाचा व्हिडीओ आणि छायाचित्र फेसबुकवर पोस्ट करीत आहे. फेसबुकवर शुभेच्छा संदेश पाठविणाऱ्यांचीही कमतरता नाही. कोणी फराळाचे फोटो पोस्ट करीत आहे, तर कोणी आकर्षक पद्धतीने संदेश लिहून ते एकमेकांना पाठवीत आहेत. दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्तेही मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. अनेकांना बेसुमार संदेश येत असल्याने त्यांच्या रंगाचा बेरंग होत आहे. (प्रतिनिधी)
सोशल मीडियावर शुभेच्छांची धूम
By admin | Published: October 31, 2016 1:28 AM