संजय पाठक, नाशिक - निवडणूकीच्या तोंडावर नाशिककरांसाठी शुभवार्ता आहे. नाशिकला दोन विद्यापीठ असताना आणखी तिसरे आणि तेही केंद्रीय विद्यापीठ होणार आहे. संस्कृत भाषेचे जतन व्हावे, आणि ही भाषा जनसामान्यांपर्यत पोहचावा यासाठी आता केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाने नाशिकमध्ये संस्कृत विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्यासाठी जिल्हा प्रशासनाला पत्रव्यवहार देखील केला असून जागेची मागणी केल्याची माहिती नाशिकचे खासदार हेमंत गेाडसे यांनी दिली.
विशेष म्हणजे मुंबईत पुरेसी जागा उपलब्ध होत नसल्याने नाशिक शहरात संस्कृत विद्यापीठाचे केंद्र उभारणीचा निर्णय केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय विभागाने घेतला आहे. विद्यापीठासाठी भूखंड उपलब्ध झाल्यावर विद्यापीठ कॅम्पसमध्ये पायाभूत सुविधांसाठी केंद्र शासनाकडून पहिल्या टप्प्यातच तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.
संस्कृत विद्यापीठासाठी जिल्हा प्रशासनाला पत्र मिळाल्यानंतर स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिलापूर शिवारातील सुमारे चाळीस एकर जागेची पाहणीही केलेली आहे.संस्कृत भाषेचे जतन व्हावे,भाषा समृद्ध व्हावी तसेच भाषेचे संवर्धन व्हावे हा विद्यापीठ उभारणी मागचा मुख्य उद्देश आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून पारंपारिक भारतीय ज्ञान प्रणालींना प्रोत्साहन देण्यात येणार असून शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना मिळणार आहे.